नवी दिल्ली/मुंबई/जकार्ता : भारतात गँगवॉरच्या अंगाने रक्तरंजित हिंसाचाराचा भडका उडवून दिल्यानंतर गेली २० वर्षे देशोदेशीच्या पोलिसांच्या हातावर तुरी देणारा ५५ वर्षांचा मोस्ट वाँटेड गँगस्टर छोटा राजन याला इंडोनेशियाच्या पोलिसांनी रविवारी बेड्या ठोकल्या. ही अटक होताच भारतीय गुप्तचर संस्थांनी त्याच्यासोबत चालविलेला मधुचंद्र अखेर संपुष्टात आला. आॅस्ट्रेलियन पोलिसांनी दिलेल्या गुप्त माहितीवरून आणि भारतीय अधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार सिडनीहून तो येताच त्याला विमानतळावरच पोलिसांनी ताब्यात घेतले. राजेंद्र सदाशिव निकाळजे उर्फ छोटा राजन याच्या अटकेची माहिती पोलिसांचे प्रवक्ते हेरी वियंतो यांनी वृत्तसंस्थेला सोमवारी दिली. राजनच्या अटकेनंतर आता मोस्ट वॉन्टेड डॉन दाऊद इब्राहिमच्या अटेकेचे वेध सरकारला लागले असून, तसे संकेतही केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिले आहेत. कुख्यात गुन्हेगार छोटा राजन याला झालेली अटक ही मुंबईतील गुन्हेगारीजगताला हलवून सोडणारी असेल, अशा शब्दांत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. राजनच्या जीविताला विशेषत: त्याला न्यायालयांमध्ये हजर करताना दाऊदच्या हस्तकांकडून मोठा धोका असल्याचे अधिकाऱ्यांचे मत असल्याने त्याच्या सुरक्षेचे नवे आव्हानही मुंबई पोलिसांना पेलावे लागणार आहे. छोटा राजनचे अखेरचे आश्रयस्थळ असलेल्या आॅस्ट्रेलियाला ‘रेड कॉर्नर’ नोटीस पाठविण्यात आली होती. आॅस्ट्रेलियन पोलिसांनी त्याला इंडोनेशियात अटक केली, अशी माहिती सीबीआयचे संचालक अनिल सिन्हा यांनी दिल्लीत दिली. छोटा राजनला अटक झाल्याची माहिती देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी खास छोटी पत्रपरिषद घेऊन समाधान व्यक्त केले. दाऊद इब्राहिमला कधी पकडणार? असे विचारण्यात आले असता, ‘आप सब देखते जायीए, आगे आगे क्या होता है’ असे उत्तर त्यांनी दिले.मुंबई पोलीसांना दूर ठेवलेछोटा राजनविरोधात मुंबई पोलिसांकडे सर्वाधिक गुन्हे नोंद असले तरी केंद्रीय यंत्रणेने त्यांना या संपूर्ण कारवाईपासून बेसावध आणि दूर ठेवले होते. राजनला अटक झाली याला दुजोरा द्यावा की इन्कार करावा यासाठी बहुतेक अधिकारी दुपारपर्यंत प्रसारमाध्यमांवर अवलंबून होते.अटक प्रकरणाला दुजोरा मिळत नसल्याचे सांगून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणावर बोलायचेही टाळले होते. प्रत्यक्षात राजन टोळीच्या संपर्कात असलेल्या विश्वासू खबऱ्याने दिलेल्या माहितीनंतर मुंबई पोलिसांची झोप उडाली. छोटा राजनचा मोबाइल दोन दिवसांपासून बंद येत आहे, हे या खबऱ्याच्या माध्यमातून समजल्यानंतर अटकेच्या उडत्या बातम्यांवर पोलिसांनीही विश्वास ठेवला.
छोटा राजन जेरबंद!
By admin | Published: October 27, 2015 2:35 AM