ऑनलाइन लोकमत
बाली (इंडोनेशिया) दि. ५ - अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला आज रात्री भारतात आणण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. इंडोनेशिया सरकार व भारत सरकार यांनी त्याच्या भारतातल्या प्रत्यार्पणासाठी कायदेशीर प्रक्रिया मंगळवारी पूर्ण केली होती, परंतु बाली नजीकच्या बेटांवर ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि वादळ झाल्यामुळे दोन दिवस बालीचा विमानतळ बंद ठेवण्यात आला होता. परंतु आज गुरुवारी उड्डाणासाठी विमानतळ खुला केला असल्यामुळे राजनच्या भारत वापसीचा मार्ग सुकर होणार आहे.
राजनला विशेष विमानतळाने भारतात आणण्यात येणार असून त्याला दिल्लीला ठेवण्यात येणार आहे. सुमारे महिनाभर त्याचा ताबा सीबीआयकडे असेल आणि त्याच्याकडून दाऊद इब्राहिमबाबतची शक्य ती माहिती काढण्याचा सुरक्षा यंत्रणांचा प्रयत्न असेल असे समजते. जवळपास ७५ गंभीर गुन्हे असलेल्या छोटा राजनवर सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद मुंबईत असून मुंबई पोलीसांनाही राजनचा ताबा हवा आहे. मात्र, त्यासाठी त्यांना काही काळ वाट बघावी लागणार आहे.
छोटा राजन स्वत:हून भारत सरकारच्या संपर्कात आला आणि त्याने अटक करवून घेतली की तो इंटरपोलच्या जाळ्यात अडकला याबाबत तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. छोटा राजनला किडनीचा विकार असून त्याला वारंवार डायलिसिस करावं लागत आहे, त्याबाबतची आरोग्य यंत्रणा तुरुंगात उभारण्यात आली आहे.
काही वृत्तांमध्ये राजनला किडनी ट्रान्सप्लांटची गरज असून त्यासाठीच तो भारतात आल्याचे सांगण्यात येत आहे. विदेशामध्ये तशी सोय असली तरी दाऊद इब्राहिम त्याला मारायला टपून बसला असल्यामुळे भारतात सुरक्षित राहता येईल असा विचार करून तो भारतात परतल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबतच्या सगळ्या बाबींवर येत्या काही दिवसांमध्ये प्रकाश पडेल अशी अपेक्षा आहे.