नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसोबत भारत सरकारचे खास संबंध आहेत, असा दावा दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त नीरज कुमार यांनी केला आहे. छोटा राजनला गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात बाली येथून देशात आणण्यात आले होते. येथे आयोजित साहित्योत्सवात शुक्रवारी रात्री पत्रकार अविरुक सेन यांच्यासोबतच्या वार्तालापात कुमार यांनी उपरोक्त दावा केला. या संदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, याचे छोटेसे उत्तर आहे ‘हो’. छोटा राजन आणि भारत सरकारमधील संबंधात काही तथ्य आहे की ही केवळ ऐकीव माहिती आहे, असा प्रश्न सूत्र संचालक मधू त्रेहन यांनी विचारला होता. यावर मी सांगतोय म्हणजे हे सत्य आहे, असे नीरज कुमार यांचे म्हणणे होते. कुमार यांनी ‘डायल डी फॉर डॉन’ या आपल्या पुस्तकात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम १९९० च्या दशकात भारतात परतण्यास इच्छुक होता आणि जून २०१३ मध्ये त्याने आपल्याला फोन केला होता, असा दावा केला आहे. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर वेगवेगळ्या प्रसंगी आपले तीनदा फरार दाऊदशी बोलणे झाले होते, असेही त्यांनी या पुस्तकात लिहिले आहे. गेल्या वर्षी प्रकाशित या पुस्तकातील गौप्यस्फोटांची बरीच चर्चा झाली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)दाऊदला पकडण्यासाठी पूर्णपणे छोटा राजनवर अवलंबून राहू नये, असेही कुमार यांनी स्पष्ट केले. दाऊदचा माजी सहकारी असलेला छोटा राजन सध्या तिहार तुरुंगात बंदिस्त आहे. (वृत्तसंस्था)
छोटा राजनचे सरकारशी खास संबंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2016 2:14 AM