ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 28 - जगभरात वाचल्या जाणाऱ्या ऑक्सफोर्ड इंग्लिश डिक्शनरीमध्ये काही नवीन शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. या नवीन शब्दांमध्ये आपल्या भारतीय दैनंदिन आयुष्यातील भोजनात समाविष्ट असणा-या चणा आणि चणा डाळ या शब्दांनाही स्थान मिळाले आहे.
तीन महिन्यांच्या कालावधीनंतर या डिक्शनरीमध्ये जीवनशैली, सुरू असलेल्या घडामोडींपासून ते शैक्षणिक जगतातील नवनवीन शब्दांचा समावेश करण्यात येतो. यावेळेस ऑक्सफोर्ड डिक्शनरीमध्ये 600 हून अधिक नवीन शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. यात चणा आणि चणा डाळ या शब्दांचाही समावेश आहे.
याव्यतिरिक्त ऑक्सफोर्ड डिक्शनरीत टेनिससंबंधीत असलेल्या काही शब्दांचाही समावेश करण्यात आला आहे. या प्रामुख्यानं "फोर्स्ड एरर" आणि "बेगल" या शब्दांचा समावेश आहे. शिवाय, "वोक" आणि "पोस्ट ट्रूथ" यांना डिक्शनरीत स्थान मिळाले आहे. 2016 मध्ये ऑक्सफोर्ड डिक्शनरीत "पोस्ट ट्रूथ" या शब्दाला "वर्ड ऑफ द इअर" म्हणून घोषित करण्यात आले होते.
यापूर्वी, "अरे यार", "भेळपुरी", "चुडीदार" तसेच "ढाबा" या शब्दांनाही ऑक्सफर्डमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. 1845 पासून आतापर्यंत अनेक शब्दांचा ऑक्सफर्डच्या शब्दकोशात समावेश करण्यात आला आहे. "चुडीदार" या शब्दाचा इंग्रजी भाषेतील उल्लेख प्रथम 1880 मध्ये करण्यात आल्याचा कागदोपत्री पुरावा उपलब्ध आहे. त्यानंतर तब्बल 135 वर्षानंतर या शब्दाला इंग्रजी शब्दांच्या यादीत स्थान मिळाले आहे. अशाप्रकारे इतर काही ऐतिहासिक आणि रोजच्या वापरातील शब्द डिक्शनरीमध्ये समाविष्ट केले गेले आहेत.