लंडन : जगभरात मान्य असलेल्या आॅक्सफर्डच्या इंग्रजी डिक्शनरीमध्ये काही नवीन शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. या शब्दांमध्ये भारतीयांच्या दैनंदिन आयुष्यातील भोजनात असलेल्या चणा आणि चणा डाळ या शब्दांनाही स्थान मिळाले आहे. दर तीन महिन्यांनंतर या डिक्शनरीमध्ये जीवनशैली, सुरू असलेल्या घडामोडींपासून ते शैक्षणिक जगतातील नवनवीन शब्दांचा समावेश करण्यात येतो. या वेळेस आॅक्सफर्ड डिक्शनरीमध्ये ६00हून अधिक नवीन शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. यात चणा आणि चणा डाळ या शब्दांचाही समावेश आहे. याखेरीज पापड, भेळपुरी, मसाला, चटणी आणि घी (तूप) या भोजनातील पदार्थांचा समावेश आॅक्सफर्ड डिक्शनरीमध्ये झाला आहे. महिलांच्या पेहरावातील चुडीदारचा समावेश आॅक्सफर्ड डिक्शनरीमध्ये १८८0मध्ये करण्यात आला होता. अय्यो, बदमाश, दिदी, पक्का, पुरी, धाबा हे भारतीय भाषांमध्ये वापरात असलेले शब्दही या डिक्शनरीमध्ये समाविष्ट झाले आहेत. या डिक्शनरीमध्ये १८४५पासून विविध भाषांमधील शब्द समाविष्ट केले जात आहेत. (वृत्तसंस्था)
आॅक्सफर्ड डिक्शनरीत चणे आणि चणा डाळ
By admin | Published: June 29, 2017 1:28 AM