नवी दिल्ली - माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना दिल्लीच्या सीबीआय कोर्टाने 5 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. बुधवारी तपास यंत्रणांनी नाट्यमय घडामोडीनंतर जोरबाग येथील चिदंबरम यांच्या निवासस्थानातून त्यांना अटक केली होती. न्या. अजय कुमार कुहाड यांच्या कोर्टात आज सुनावणी झाली. या सुनावणी चिदंबरम यांच्या बाजूने कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी यांनी कोर्टात बाजू मांडली. चिदंबरम यांना जामीन देण्याची वकिलांची मागणी कोर्टाने फेटाळून लावली.
पी. चिदंबरम प्रकरणात संध्याकाळी 5.30 पर्यंत सुनावणी सुरू होती त्यानंतर कोर्टाने निर्णय राखून ठेवला. त्यानंतर सीबीआय कोर्टाने अर्ध्या तासानंतर पी. चिदंबरम यांना 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचा निर्णय दिला. त्याचसोबत कोर्टाने चिदंबरम यांना प्रत्येक दिवशी 30 मिनिटे आपल्या वकिलांना आणि कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी दिली.
सुनावणीवेळी सीबीआयने कोर्टात केस डायरी सादर केली. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी पी. चिदंबरम यांना 5 दिवसांची कोठडीची मागणी केली. पी. चिदंबरम तपास यंत्रणांना चौकशीत सहकार्य करत नाही. त्यामुळे त्यांची आणखी चौकशी होणं गरजेचे आहे. आरोपीच्या पिंजऱ्यात चिदंबरम उभे होते. त्यांना न्यायाधीशांनी बसण्यात सांगितले असता त्यांनी उभं राहणचं पसंत केलं.
चिदंबरम यांची बाजू मांडताना कपिल सिब्बल यांनी कोर्टात सांगितले की, या प्रकरणातील अन्य आरोपींना जामीन मिळाला आहे. FIPB बोर्डाला मान्यता देणाऱ्यांमध्ये 6 सरकारी सचिव होते, सीबीआयने त्यातील कोणालाही अटक केली नाही. या प्रकरणाची चौकशी पूर्ण व्हावी. आरोपपत्राचा आराखडा तयार केला मात्र तो सादर केला नाही. तर अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटलं की, सीबीआयला पी चिदंबरम यांना अटक करण्याची इतकी घाई का झाली? सीबीआय चुकीच्या पद्धतीने या प्रकरणाचा तपास करत आहे. सीबीआयला जे हवं ती उत्तरं चिदंबरम देणार नाहीत.
पी. चिदंबरम यांना कोर्टात बोलण्याची अनुमती द्यावी अशी मागणी अभिषेक मनु सिंघवी यांनी केली. त्यानंतर कोर्टाने चिदंबरम यांना बोलण्याची परवानगी दिली. यावेळी कोर्टात चिदंबरम म्हणाले की, न्यायलयाने सीबीआयचे प्रश्न आणि उत्तरे एकदा तपासावे, असा कोणताही प्रश्न नाही ज्याला मी उत्तरं दिली नाहीत. त्यांनी मला विचारलं तुमचं बाहेर कुठे खाते आहे का? यावर मी नाही म्हणून सांगितलं. त्यांनी मला विचारलं तुमच्या मुलाचं परदेशात खाते आहे का? यावर मी होय असं उत्तर दिलं.