नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री तथा काँग्रेस नेते पी. चिदम्बरम यांची विदेशी बँकांत १७ खाती, तसेच विविध देशांत १० मालमत्ता आहेत, असा दावा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सर्वोच्च न्यायालयात केल्याच्या दुसऱ्या दिवशी चिदम्बरम यांनी ही खाती आणि मालमत्ता यांचा तपशील न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून द्या, असे आव्हान ईडीला दिले आहे.
ईडीचे आरोप चिदम्बरम यांनी एक स्वतंत्र प्रतिज्ञापत्र दाखल करून फेटाळून लावले आहेत. प्रतिज्ञापत्रात म्हटले की, माझी विदेशात कोणत्याही प्रकारची मालमत्ता आणि बँक खाती असल्याचे ईडीने सिद्ध केल्यास मी शपथेवर खोटे बोलण्याच्या खटल्यास सामोरे जाण्यास तयार आहे. आपण तपासात सहकार्य केले नाही, हे सिद्ध करण्यासाठी ईडीने माझ्या चौकशीतील जाब-जबाबाची लिखित प्रत न्यायालयात सादर करावी.
चिदम्बरम यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी न्या. आर. भानुमती आणि न्या. ए.एस. बोपन्ना यांच्या पीठास विनंती केली की, चिदम्बरम यांच्या विदेशातील कथित मालमत्ता व बँक खात्यांचा तपशील आणि पुरावे प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयात सादर करण्याचे आदेश ईडीला देण्यात यावेत.आणीबाणीच्या काळातील एडीएम जबलपूर खटल्याचा हवाला देऊन सिंघवी यांनी म्हटले की, आणीबाणीत नागरिकांचे मूलभूत अधिकार निलंबित करण्यात आलेले असतानाही व्यक्तीला प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ताब्यात घेण्याच्या बाबतीत न्यायालये पोलिसांचा सीलबंद अहवाल ग्राह्य धरीत नसत. चिदम्बरम यांच्या अटकपूर्व जामिनावर विचार करताना न्यायालयाने सीलबंद तपास अहवालाच्या मार्गाने जाऊ नये.