नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांची विदेशात संपत्ती असल्याचा दावा सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) केला आहे. या प्रकरणातील आरोपींसह पी. चिदंबरम विदेशात संपत्ती विकण्यासाठी आणि विदेशी बँक खाती बंद करुन पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहेत, असे ईडीने म्हटले आहे.
दरम्यान, सोमवारी सीबीआयने पुन्हा पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टापुढे हजर करून आणखी पाच दिवसांच्या कोठडीसाठी अर्ज केला. त्यावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश कुहार यांनी आणखी चार दिवसांच्या कोठडीचा आदेश दिला. सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात सीबीआयने दावा केला आहे की, पी. चिदंबरम यांची अनेक देशात बँक खाती आहेत.
ईडीने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, पी चिदंबरम आणि याप्रकरणातील अन्य आरोपींनी अर्जेंटिना, ऑस्ट्रिया, ब्रिटिश व्हर्जिन आईसलँड, फ्रान्स, ग्रीस, मलेशिया, मोनाको, फिलिफिन्स, सिंगापूर, साऊथ आफ्रिका, स्पेन, श्रीलंका याठिकाणी संपत्ती खरेदी केली आहे. तसेच, येथील बँकांमध्ये खाती उघडून बनावट कंपन्याच्या माध्यमातून पैशांची देवाण-घेवाण केली आहे. तसेच, पी. चिदंबरम यांच्या जामीन अर्जाला विरोध करत ईडीने त्यांच्यावर पुरावे नष्ट केल्याचा आरोप केला.
सुप्रीम कोर्टात सुनावणी अपूर्णअटकपूर्व जामीन नाकारण्याच्या दिल्ली हायकोर्टाच्या निकालाविरुद्ध पी.चिदंबरम यांनी सुप्रीम कोर्टात दोन अपिले केली होती. ती सुनावणीस येण्याआधीच ‘सीबीआय’ने त्यांना अटक केल्याने त्यासंबंधीचे अपील न्यायालयाने आता निरर्थक झाल्याचे ठरवून निकाली काढले. ‘ईडी’च्या प्रकरणातील अपिलावर न्या. आर. भानुमती व न्या. बोपण्णा यांच्या खंडपीठापुढील सुनावणी अपूर्ण राहिली. ती मंगळवारी पुन्हा होईल. तोपर्यंत अटक न करण्याचा तात्पुरता आदेश लागू राहील.