पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केल्याने चिदंबरम अडचणीत, काँग्रेसने पाठवली नोटिस, १० दिवसांत मागितलं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 08:04 PM2024-01-09T20:04:03+5:302024-01-09T20:04:27+5:30
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करणं काँग्रेसचे नेते कार्ती चिदंबरम यांना चांगलंच महागात पडलं आहे. या कृतीबद्दल काँग्रेस पक्षाकडून त्यांना कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करणं काँग्रेसचे नेते कार्ती चिदंबरम यांना चांगलंच महागात पडलं आहे. या कृतीबद्दल काँग्रेस पक्षाकडून त्यांना कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली आहे. तसेच या नोटिशीला दहा दिवसांच्या आत उत्तर देण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहे. कार्ती चिदंबरम हे काँग्रेसचे दिग्गज नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र आहेत.
एका मुलाखतीमध्ये कार्ती चिदंबरम यांनी सांगितले होते की, राहुल गांधी यांच्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अधिक लोकप्रिय आहेत. हेच विधान आता कार्ती चिदंबरम यांच्यासाठी अडचणीचे ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल गांधी यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय आहेत असं म्हटल्याने तामिळनाडू प्रदेश काँग्रेसच्या शिस्तपालन समितीचे प्रमुख के. आर. रामसामी यांनी कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. तसेत त्याला दहा दिवसांच्या आत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.
या मुलाखतीमध्ये कार्ती चिदंबरम यांनी ईव्हीएमबाबतही विश्वास व्यक्त केला होता. हा एक असा मुद्दाआहे ज्यावर काँग्रेसचा निवडणूक आयोगासोबत वाद सुरू आहे. काँग्रेस ईव्हीएमच्या विश्वसनीयतेबाबत शंका उपस्थित करून त्याच्या वापरावर सक्रियपणे विरोध करत आहे. जयराम रमेश यांनी या मुद्द्यावरून निवडणूक आयोगाला पुन्हा पत्र लिहिले आहे.