नवी दिल्ली : ‘आयएनएक्स मीडिया’ कंपनीतील परकीय गुंतवणुकीत झालेल्या कथित गैरव्यवहारांच्या आरोपांवरून ‘सीबीआय’ने अटक केलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी नियमित जामिनासाठी केलेला अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळला. याच न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर २२ आॅगस्ट रोजी चिदंबरम यांना अटक झाली असून, ते न्यायालयीन कोठडीत आहेत.चिदंबरम हे प्रभावशाली व्यक्ती असल्याने जामिनावर सुटल्यास ते साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता आहे, असे कारण देऊन न्या. सुरेशकुमार कैत यांनी त्यांना जामीन नाकारला. चिदंबरम यांना जामीन देण्याचा आग्रह धरताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल व अभिषेक मनू सिंघवी यांनी मुद्दे मांडले."या गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त सात वर्षांची शिक्षा असल्याने तो अतिशय गंभीर नाही. चिदंबरम प्रतिष्ठित व्यक्ती असल्याने ते पळून जाण्याची शक्यता नाही. सर्व पुरावे कागदपत्रांच्या स्वरूपात आहेत व ती सर्व सीबीआयच्या ताब्यात आहेत, त्यामुळे त्यात हेराफेरी केली जाण्याची शक्यता नाही. प्रामुख्याने ज्यांच्या जबानीवरून त्यांना आरोपी करण्यात आले आहे त्या इंद्राणी मुखर्जी स्वत: खुनाच्या खटल्यात आरोपी आहेत.विदेशात जाण्याची भीतीजामिनाला विरोध करताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी असा प्रतिवाद केला होता की, विदेशी गुंतवणूक प्रस्तावात अनेक अनियमितता असूनही तो चिदंबरम यांच्या पदाच्या प्रभावामुळेच मंजूर झाला. चिदंबरम यांची सांपत्तिक स्थिती पाहता ते विदेशात पळून जाऊन दीर्घकाळ तेथे राहू शकतात. त्यांचे तुरुंगाबाहेर असणेही संभाव्य साक्षीदारांवर दडपण येण्यास पुरेसे आहे.
चिदंबरम यांचा जामीन फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 4:45 AM