नवी दिल्ली : ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदम्बरम केंद्रीय वित्तमंत्री असताना ‘आयएनएक्स मीडिया’ व ‘एअरसेल मॅक्सिस’ खेरीज आणखी चार कंपन्यांचे परकीय गुंतवणुकीचे प्रस्ताव कोट्यवधी रुपयांची ‘लांच’ घेऊन परकीय गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले व ही लांचेची रक्कम अनेक बनावट ‘शेल ’ कंपन्या काढून त्या मार्गे वळविण्यात आली असा अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) संशय असून त्यादृष्टीने चिदम्बरम व त्यांच्या चिरंजीवाविरुद्ध सध्या सुरु असलेल्या ‘मनी लॉड्रिंग’च्या कपासाची व्याप्ती वाढविण्यात येत आहे.आतापर्यंतच्या तपासावरून उघड झालेल्या माहितीच्या आधारे हा संशय व्यक्त करताना ‘ईडी’मधील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, जियाजियो स्कॉटलंड लि., कटारा होल्डिंग्ज, एस्सार स्टील लि. आणि एलफोर्ज लि. या आणखी चार कंपन्यांच्या विदेशी गुंतवणुकीच्या व्यवहारांत गैरप्रकार झाल्याचे दिसते. ‘लांच’ म्हणून दिलेली रक्कम भारतात व विदेशांत नोंदलेल्या ज्या ‘सेल’ कंपन्यांच्या मार्गे वळविण्यात आली त्यापैकी अनेक कंपन्यांमध्ये चिदम्बरम व त्यांचे चिरंजीव कार्ति लाभार्थी असल्याचीही माहिती मिळते.आता विसर्जित करण्यात आलेले विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ त्या काळी थेट वित्त मंत्रालयाच्या अखत्यारित काम करीत असे. कार्ति यांच्या माध्यमातून वित्तमंत्री या नात्याने चिदम्बरम यांच्या पदाचा वापर करून गुंतवणुकीच्या या परवानग्या दिल्या गेल्या, असे ‘ईडी’चे म्हणणे आहे. एका ‘शेल’ कंपनीत ३०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा केली गेल्याच्या नोंदीही तपासात दिसून आल्याचा या तपासी यंत्रणेचा दावा आहे.‘ईडी’च्या सूत्रांचे असेही म्हणणे आहे की, चिदम्बरम पिता-पुत्रांना मिळालेले लांच म्हणून मिळलेले हे पैसे त्यांनी व्यक्तिगत खर्चासाठी, दोन डझनांहून अधिक विदेशी खात्यांमध्ये जमा करण्यासाठी व मलेशिया, ब्रिटन व स्पेनसह अन्य देशांमध्ये स्थावर मलमत्ता खरेदीसाठी वापरले.
आणखी चार व्यवहारात चिदम्बरम यांच्यावर संशयाची सुई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 5:45 AM