अहमदाबाद : २००२ साली घडलेल्या गोध्रा रेल्वे हत्याकांडातील १४ वर्षांपासून फरार असलेल्या प्रमुख आरोपीला बुधवारी एटीएसने ताब्यात घेतले. या घटनेत ५९ कारसेवक मरण पावले होते. या घटनेनंतर गुजरातमध्ये धार्मिक दंगली भडकल्या होत्या. एटीएस अधिकाऱ्याने सांगितले की, फारुख मोहंमद भाना असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याने गोध्रा रेल्वे स्टेशनवर २७ फेब्रुवारी २००२ रोजी रेल्वेला आग लावण्याचा कट रचला होता. त्या वेळी भाना गोध्रा येथे नगरसेवक होता. अटक टाळण्यासाठी तो मुंबईला गेला होता आणि मुंबईत त्याने प्रॉपर्टी ब्रोकर म्हणून व्यवसाय सुरू केला होता. त्याच्याबाबत माहिती मिळाल्यावर पंचमहाल जिल्ह्यातील कलोल गावानजीक भानाला पकडण्यात आले. तो मुंबईहून गोध्राला जात होता. गोध्रा रेल्वे स्टेशननजीक अमन गेस्ट हाऊसमध्ये अन्य आरोपींसोबत बैठक घेऊन त्याने एस-६ डब्याला आग लावण्याचा कट रचल्याचे त्याच्याविरुद्ध नोंदविण्यात आलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे.>काय आहे प्रकरण?भाना तसेच अन्य एक नगरसेवक बिलाल हाजी यांनी कथितरीत्या मौलाना उमरजी याच्याकडून मिळालेल्या निर्देशाच्या आधारे रेल्वेला आग लावण्यास सांगितले होते. या घटनेतील मुख्य कटकारस्थान करणारा म्हणून उमरजीला अटक करण्यात आली होती. तथापि, नंतर त्याला सोडून देण्यात आले. साबरमती एक्स्प्रेसच्या एस-६ कोचमध्ये आग लागून ५९ लोक मरण पावले होते.
गोध्राकांडाचा मुख्य आरोपी १४ वर्षांनी एटीएसच्या ताब्यात
By admin | Published: May 19, 2016 5:49 AM