नवी दिल्ली : बाललैंगिक अत्याचाराचे अश्लिल व्हिडिओ काढून ते परस्परांमध्ये शेअर करणा-या एका आंतरराष्ट्रीय व्हॉट््सअॅप ग्रुपविरुद्ध केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय)ने गुन्हा नोंदविला आहे. तसेच याप्रकरणी या ग्रुपच्या एकूण पाच अॅडमिनपैकी मुख्य अॅडमिनला अटक केली आहे.सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार या व्हॉट््सअॅप ग्रुपचे नाव ‘किड््स एक्सएक्सएक्स’ असे असून या ग्रुपच्या कारवाया हा कदाचित बालकांच्या अश्लिल लैंगिक चित्रफिती काढून त्या प्रदर्शित करण्याच्या जागतिक गुन्हेगारीचा भाग असावा, असा संशय आहे. या ग्रुपचे एकूण ११९ सदस्य असून ते भारतासह अमेरिका, पाकिस्तान, चीन व ब्राझिलसह विविध देशांतील आहेत. व्हॉट््सअॅपच्या माध्यमातून ‘पोर्नोग्राफी’ केली जाण्याबद्दल नोंदविला गेलेला अशा प्रकारचा हा पहिलाच गुन्हा आहे.अटक केलेल्या अॅडमिनचे नाव निखिल वर्मा असे असून त्याला उत्तर प्रदेशातील कनौज येथून अटक केली गेली. त्याला दिल्लीला आणले जात आहे.. तो याचा सूत्रधार आहे. हा आरोपी २० वर्षांचा असून बेरोजगार वाणिज्य पदवीधर आहे. मुंबईचा सत्येंद्र चौहान, दिल्लीचे नफीज राजा व झाहिद आणि नॉयडाचा आदर्श अशी या ग्रुपच्या अन्य चार अॅडमिनची नावे आहेत. सीबीआयने या सर्वांच्या निवासस्थानांवर धाडी टाकून संगणक, हार्ड डिस्क, स्मार्टफोन तसेच ‘चाईल्ड पोर्नोग्राफ’चे व्हिडिओ व फोटो हस्तगत केले. या ग्रुपवर टाकल्या जाणाºया व्हिडिओंमध्ये दिसणाºया अल्पवयीन मुलांची ओळख अद्याप पटलेली नाही.
अश्लील व्हॉट्सअॅप ग्रुपच्या मुख्य अॅडमिनला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 6:06 AM