दुर्गम भागात मुख्य निवडणूक आयुक्तांची पायपीट, जाणून घेतल्या निवडणूक यंत्रणेसमोरील अडचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 05:34 AM2022-06-06T05:34:51+5:302022-06-06T05:35:17+5:30
chamoli in uttarakhand : राजीवकुमार यांनी अतिदुर्गम गावांचा दौरा केला त्याच दिवशी शुक्रवारी चंपावत विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचाही निकाल लागणार होता.
चामोली : उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यात अतिदुर्गम भागातील डुमक व कलगोठ या दोन गावांमध्ये मतदान केंद्रे उभारताना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार शुक्रवारी डोंगराळ प्रदेशातून १८ किमी पायपीट करीत त्या परिसरात पोहोचले. त्यांच्या या प्रयत्नांचे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे.
राजीवकुमार यांनी सांगितले की, उत्तराखंडमध्ये कोणत्याही निवडणुकांच्या वेळी डुमक व कलगोठ येथे मतदान केंद्रे उभारण्यासाठी कर्मचारी, तसेच सुरक्षा जवानांना तिथे पोहोचण्याकरिता तीन दिवस पायी चालत प्रवास करावा लागतो. इतक्या दुर्गम भागात निवडणुकांची पूर्वतयारी करणे हे एक प्रकारचे आव्हान आहे. या गोष्टी समजून घेण्यासाठी मी या दोन गावांना भेट दिली. मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी दौरा केलेली डुमक व कलगोठ गावे बद्रीनाथ विधानसभा मतदारसंघामध्ये येतात.
राजीवकुमार यांनी अतिदुर्गम गावांचा दौरा केला त्याच दिवशी शुक्रवारी चंपावत विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचाही निकाल लागणार होता. या पोटनिवडणुकीत उत्तराखंडचे विद्यमान मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी हे ५५ हजार मतांनी विजयी झाले.
उत्तराखंडमध्ये गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांत भाजपचा विजय झाला असला तरी
त्यावेळी पुष्करसिंह धामी यांचा पराजय झाला होता. मुख्यमंत्रीपदी कायम राहण्यासाठी पुन्हा निवडणुकीत विजय मिळविणे धामी यांच्याकरिता आवश्यक होते. (वृत्तसंस्था)
आणखी गावांचा दौरा करणार
मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार म्हणाले की, देशातील आणखी काही अतिदुर्गम भागातील गावांना मी भविष्यात भेट देणार आहे. या भागांमध्ये निवडणूक यंत्रणेला येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी आणखी काय उपाययोजना करता येतील याचा विचार निवडणूक आयोग करणार आहे.