ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. १८ - संपूर्ण देशाला हादरवणा-या गोध्रा हत्याकांडातील प्रमुख आरोपी फारूख बाना याला गुजरात दहशतवाद विरोध पथकाने ( एटीएस) बुधवारी सकाळी अटक केली. २७ फेब्रुवारी २००२ रोजी गोध्रा स्टेशनवर साबरमती एक्स्प्रेसला आग लावण्यात आली होती, त्यामध्ये ५९ प्रवासी जळून खाक झाले होते. १४ वर्षांपूर्वी झालेल्या या जळीतकांडानंतर संपूर्ण गुजरातमध्ये जातीय दंगली पेटल्या होत्या, ज्यामध्ये हजारो निरपराध नागरिकांना जीव गमवावा लागला होता. त्यामध्ये बव्हंशी अल्पसंख्याकांचा समावेश होता.
या जळीतकांडामागचा प्रमुख सूत्रधार असणा-या फारूख बाना हा गोध्रा महापालिकेतील माजी नगरसेवक असून गुजरात एटीएसने बुधवारी त्याला पंचमहल जिल्ह्यातील कालोल येथून बेड्या ठोकल्या.अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार भाना या कटाचा मुख्य सूत्रधार होता. गोध्रा रेल्वे स्थानकाजवळच्या फूलन बाजारातील अमन गेस्ट हाऊसमध्ये त्याने बैठक घेतली होती. साबरमती एक्सप्रेस रात्री दोनऐवजी सकाळी सात वाजता येणार असल्याचे त्याने सांगितले होते. ट्रेनला आग लावण्यासाठी त्याने १४० लिटर पेट्रोलचीही व्यवस्था केली होती अशी माहिती एटीएसच्या अधिका-यांनी दिली.
भानाला सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या एसआयटीच्या हवाली सुपूर्द केले जाणार आहे. २७ फेब्रुवारी २००२ रोजी गोध्रा स्थानकावर आलेल्या साबरमती एक्सप्रेसच्या एस-६ डब्ब्याला जमावाने आग लावली होती. त्यात ५९ कारसेवकांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण गुजरातमध्ये जातीय दंगलीना सुरुवात झाली होती. २०११ मध्ये याप्रकरणात विशेष न्यायालयाने ३१ आरोपींना दोषी ठरवले आणि ६३ जणांची निर्दोष सुटका केली. ११ जणांना न्यायालयाने मृत्यूदंडाची तर, २० जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
When we received information about Farooq Bhana travelling to Godhra frequently,we nabbed him: JK Bhatt,Joint CP,CB pic.twitter.com/nBxXSOT14J— ANI (@ANI_news) May 18, 2016
दरम्यान जानेवारी महिन्यातच अहमदाबाद एटीएसने या जळीतकांडातील एक संशयित आरोपी अबरार पठाण ( वय .४८, उत्तरप्रदेश) याला पालघरमधून अटक केली होती. गुजरातमध्ये २००२मध्ये घडलेल्या गोध्रा हत्याकांडातील तो संशयीत आरोपी होता. गुजरात दहतवादी विरोधी पथक अनेक वर्षांपासून त्याच्या मागावर होते. २३ जानेवारी रोजी आरोपी अबरार हा सिडको औद्योगिक वसाहतीमधील ड्युरिअन या लाकडी फर्निचर बनविणाऱ्या कंपनीमधील माल आपल्या ट्रकमध्ये भरीत असताना अहमदाबादच्या दहशतवादी विरोधी पथकाने त्याच्यावर झडप घालून त्याला अटक केली. उत्तरप्रदेश राज्यातील वाराणशीजवळील पिंडासे गावातील हा आरोपी अनेक वर्षांपासून पालघरमध्ये एकटाच राहत होता.