नवी दिल्ली - सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप एका महिलेने केला होता. याप्रकरणी चौकशीसाठी नियुक्त केलेल्या समितीने आपला अहवाल सादर केला आहे. त्यानुसार, सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. गोगोई यांनी कुठल्याही प्रकारे संबंधित महिलेशी गैरवर्तन केले नसल्याचे या समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे.
सरन्यायाधीस रंजन गोगोई यांनी त्यांच्या राहत्या घरी 11 आणि 11 ऑक्टोबर 2018 रोजी माझ्यासोबत लैंगिक शोषण केल्याचा दावा 35 वर्षीय महिलेनं केला होता. या महिलेनं 19 शुक्रवार एप्रिल रोजी 22 न्यायाधीशांना पत्र लिहून याबाबत माहिती दिली. गोगई यांनी मला कवेत घेऊन घट्ट आवळलं, नको तिथं स्पर्श केला. मी कशीबशी तेथून स्वत:ची सुटका करुन घेतली, असे पीडित महिलेनं आपल्या पत्रात म्हटलं आहे. विशेष म्हणजे संबंधित महिला 2016 ते 2018 या कालवधीत रंजन गोगोई यांची सर्वोच्च न्यायालयात असताना सहकारी राहिलेली आहे. या महिलेने 22 न्यायाधीशांना प्रतिज्ञापत्र लिहून गोगोई यांच्यावर हे खळबळजनक आरोप केले होते. मात्र, गोगई यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले होते. तर, गोगई यांच्या सचिवांनीही एका ई-मेलद्वारे हे आरोप फेटाळून लावले होते.
याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील 3 न्यायाधीशांची एक चौकशी समिती गठन करण्यात आली होती. या समितीने सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरुद्ध करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. तसेच याप्रकरणात कुठलाही वास्तवाशी संबंधित पुरावा नसून रंजन गोगई यांनी महिलेवर लैंगिक अत्याचार केला नसल्याचा निकाल समितीने दिला आहे.