अपात्रता खटल्याची लवकर सुनावणी व्हावी, यासाठी द्धवसेनेच्या वकिलाने वारंवार केलेल्या विनंतीमुळे नाराज झालेले सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड त्यांना म्हणाले की, एक दिवसासाठी इथे बसून पाहा. मी खात्रीने सांगतो, तुम्ही जीव मुठीत घेऊन पळून जाल. सरन्यायाधीश चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला व न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचे खंडपीठ महाराष्ट्रातील राजकीय वादाशी संबंधित दोन स्वतंत्र याचिकांवर सुनावणीसाठी तारखा निश्चित करत होते.
जून २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला खरा राजकीय पक्ष म्हणून घोषित करण्याच्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आदेशाला उद्धवसेनेने आव्हान दिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटालाच खरी राष्ट्रवादी काँग्रेस घोषित करण्याच्या नार्वेकर यांच्या निर्णयाला आव्हान देणारी दुसरी याचिका शरद पवार गटाने दाखल केली आहे.
नेमके काय घडले?उद्धव सेनेच्या वकिलाने जवळची तारीख देण्याची मागणी केली. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या असून, या प्रकरणाची लवकरच सुनावणी करावी, असे ते म्हणाले. वकिलाने सांगितले की, कागदपत्रांचे संकलन दोन-तीन दिवसांत करता येऊ शकते. यावर सरन्यायाधीश म्हणाले की, कृपया न्यायालयाला आदेश देऊ नका. तुम्ही एक दिवसासाठी इथे येऊन का बसत नाहीत आणि तुम्हाला कोणती तारीख हवी आहे हे कोर्ट मास्तरांना सांगा. न्यायालयावर कामाचा किती ताण आहे ते तुम्ही पाहू शकता, असेही सरन्यायाधीश म्हणाले.