महाराष्ट्राचे सुपूत्र आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळीत हे लवकरच निवृत्त होणार आहेत. त्यांनी आपल्या कमी कालावधीमध्ये खटल्यांच्या वेळकाढूपणावर रामबाण उपाय काढला होता. आता त्यांनी पुढच्या सरन्यायाधीशांच्या नावाची केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे. न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड देशाचे ५० वे सरन्यायाधीश असणार आहेत.
देशाच्या इतिहासात हा योग पहिल्यांदाच आला आहे. वडिलांनंतर त्यांचा मुलगा देखील सर्वोच्च न्यायसंस्थेचे सर्वोच्च पद सांभाळणार आहे. डी वाय चंद्रचूड यांचे वडील यशवंत विष्णु चंद्रचूड़ हे देशाचे १६ वे सरन्यायाधीश होते. त्यांचा कार्यकाळ हा २२ फेब्रुवारी १९७८ ते ११ जुलै, १९८५ एवढा प्रदीर्घ म्हणजेच सात वर्षांचा राहिला होता. ते रिटायर झाल्यानंतर ३७ वर्षांनी त्यांचा मुलगा धनंजय यशवंत चंद्रचूड सीजेआय पदावर बसणार आहे.
डी वाय चंद्रचूड यांनी आपल्याच वडिलांचे दोन महत्वाचे निर्णय बदलले होते. ते धडक निर्णयांसाठी देखील चर्चेत असतात. चंद्रचूड यांचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर २०२२ ते १० नोव्हेंबर २०२४ असा दोन वर्षांचा असणार आहे. सरन्यायाधीश उदय लळीत यांनी कायदा मंत्री किरण रिजिजू यांना चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केली आहे. ९ नोव्हेंबरला नव्या सरन्यायाधीशांना शपथ दिली जाणार आहे.
रिजिजू यांनी सरन्यायाधीशांना त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल, त्याच्या नावाची शिफारस करण्याचे पत्र ७ ऑक्टोबरला लिहिले होते. कायदा मंत्रालयाने आग्रह केल्यानंतर नव्या सीजेआयचे नाव सुचविण्याची परंपरा आहे.