आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये भारतीय शिलेदारांनी विक्रमी १०७ पदके जिंकली. खरं तर भारताच्या दोन्ही पुरूष आणि महिला संघाला कबड्डीमध्ये सुवर्ण पकद जिंकण्यात यश आले. पुरूषांच्या अंतिम सामन्यात काही नाट्यमय घडामोडी घडल्या. गतविजेता इराण आणि भारत यांच्यातल्या या सामन्यात एका निकालाने रेफरींचा ताप वाढवला अन् दोन्ही संघ मैदानावर ठिय्या मारून बसले. ६५ सेकंदाचा खेळ शिल्लक असताना एका निर्णयावरून राडा झाला आणि जवळपास ४५ मिनिटे सामना थांबला होता. अखेर दोन्ही संघांनी सांमजस्यानं घेतलं आणि मॅच सुरू झाली. भारताने झटपट गुण मिळवून ३३-२९ अशी बाजी मारली. भारतीय पुरुष संघाने आठव्यांदा कबड्डीचेसुवर्ण पदक नावावर केले. पदक विजेत्या भारतीय खेळाडूंचे मायदेशात जंगी स्वागत करण्यात आले. खेळाडूंना आर्थिक मदत म्हणून बक्षीसे देखील दिली जात आहेत.
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या भारतीय कबड्डी संघाचा सदस्य पवन सेहरावतचा सन्मान केला. यादरम्यान केजरीवाल यांनी नुकत्याच चीनमधील हांगझोऊ येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या दिल्लीतील खेळाडूंचे अभिनंदन केले. खेळाडूंच्या सन्मानासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. केजरीवाल म्हणाले की, आम्ही एक कार्यक्रम आयोजित करू जिथे दिल्लीच्या सातही खेळाडूंचा सन्मान केला जाईल. तसेच त्या कार्यक्रमात पवन सेहरावतला एक कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल.
दरम्यान, आशियाई क्रीडा स्पर्धेच्या ७२ वर्षांच्या इतिहासात बहुतांश वेळा भारताने १५ ते २५ पदकांची कमाई केली. मात्र, मागील चार आशियाई खेळांमध्ये भारत सातत्याने ५०+ पदके जिंकत आहे. गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत (२०१८) भारताने प्रथमच ७० पदकं जिंकली होती. मात्र, यावेळी भारत मागील आकड्यांपेक्षा पुढे गेला असून विक्रमी १०७ पदके जिंकण्यात भारतीय शिलेदारांना यश आले.