अमरावती : दोन आठवड्यांपूर्वी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असलेले आणि केंद्रात विरोधकांचे सरकार स्थापन करण्यासाठी धावाधाव करणारे चंद्राबाबू नायडू आता राज्यातील विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून बसणार आहेत. तेलगू देसम आमदारांच्या बैठकीत त्यांची नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.आंध्र प्रदेशात विधानसभा निवडणुकीत तेलगू देसमचा दारूण पराभव झाला. त्या पक्षाचे केवळ २३ उमेदवारच विधानसभेवर निवडून आले आहेत. हे आमदार आणि पक्षाचे तीन खासदार यांची बुधवारी बैठक झाली. त्या बैठकीत नायडू यांच्या नेतृत्वावर विश्वास प्रकट करण्यात आला. त्यानंतर, नायडू यांनी पक्षाच्या संसदीय मंडळाचा नेता म्हणून खासदार गल्ला जयदेव यांची नेमणूक केली. लोकसभेतील नेता म्हणून के. राजमोहन नायडू, तर राज्यसभेतील नेता म्हणून के. सत्यनारायण चौधरी यांचीही त्यांनी नियुक्ती केली.या बैठकीस पक्षाचे इतर नेतेही उपस्थित होते. त्यामुळे पक्षाच्या पराभवाविषयी बैठकीत चर्चा होईल, पराभवाची कारणे शोधण्याचा प्रयत्न होईल व यापुढे राज्यात पक्षाने काय भूमिका बजावावी, हे ठरेल, अशी अपेक्षा होती, पण त्यापैकी काहीच झाले नाही. बैठकीनंतर नायडू म्हणाले की, राज्यात चांगल्या व सकारात्मक विरोधकाची भूमिका बजावू. नव्या सरकारने राज्याच्या हिताची पावले उचलावीत, अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी आम्ही नव्या सरकारला पाठिंबाही देऊ . (वृत्तसंस्था)>राज्यव्यापीदौऱ्याचे यशवायएसआर रेड्डी यांच्या निधनानंतर आपणास राज्याचे मुख्यमंत्रिपद देण्यात यावे, अशी मागणी जगन मोहन रेड्डी यांनी काँग्रेस श्रेष्ठींकडे केली होती, पण पक्षनेतृत्वाने त्या मागणीकडे पूर्ण दुर्लक्ष केले. त्यामुळे जगन मोहन यांनी वायएसआर काँग्रेस हा नवा पक्ष स्थापन केला. बिनहिशेबी संपत्ती प्रकरणात ते काही काळ तुरुंगातही होते. तेथून बाहेर आल्यानंतर त्यांनी राज्यात पक्षसंघटना बांधणीला प्राधान्य दिले. त्यासाठी त्यांनी राज्यातील प्रत्येक गावाला भेट दिली. त्यांच्या या दौºयामुळे त्यांना या निवडणुकीत यश मिळाले, असे मानले जात आहे.
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू होणार विरोधी पक्षनेते
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 4:33 AM