मुख्यमंत्री चौहान यांची वक्तव्ये म्हणजे करमणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 06:48 AM2021-09-08T06:48:17+5:302021-09-08T06:48:49+5:30
दोन वर्षांत चार हजार घोषणा -कमलनाथ
अभिलाष खांडेकर
भोपाळ : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची वक्तव्ये ही राज्यातील जनतेसाठी मोठ्या करमणुकीची ठरत आहेत. कधी ते म्हणतात, भूमाफियांना १० फूट खोल खड्ड्यात गाडून टाकेन, तर कधी दारू माफियांना किंवा समाजकंटकांना नव्याने धमकी देतात.
ग्वॉल्हेर, चंबळ आणि विदिशा भागांत पूरग्रस्तांना मदत वाटपात झालेल्या कथित भ्रष्टाचाराबद्दल अधिकाऱ्यांना त्यांनी नुकतीच धमकी दिली. भ्रष्टाचार अजिबात सहन करणार नाही, हे आमचे धोरण आहे. कोणताही गैरप्रकार आढळल्यास मी अधिकाऱ्यांना सोडणार नाही, असे चौहान म्हणाले. या आधी ते म्हणाले होते की, “मी अधिकाऱ्यांना खाली डोके वर पाय, असे टांगून टाकीन.”
राजकीय विश्लेषक दीपक तिवारी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, “मुख्यमंत्री खूप दिवसांपासून असे बोलत आहेत तरी त्यांच्या कारकीर्दीत नोकरशाहीत भ्रष्टाचार हा अनिर्बंध सुरू आहे.”
राज्याचे मंत्री ओम सकलेचा यांनी नुकताच जाहीरपणे “राज्यात मंत्र्यांपेक्षा नोकरशहा फार शक्तिशाली आहेत,” अशा शब्दांत खेद व्यक्त केला होता.