दिल्ली - राज्यातील सत्तास्थापनेबाबत राजधानी दिल्लीत मोठ्या हालचाली सुरु आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. जवळपास ४० मिनिटे चाललेल्या या भेटीमध्ये अवकाळी पाऊस आणि राज्यातील सत्ता समीकरणावर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सत्ता स्थापनेवर मोठं विधान केलं आहे.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात लवकर नवं सरकार स्थापन होईल, सत्ता स्थापनेबाबत कोण काय बोलतंय यावर बोलणार नाही असं सांगत महाराष्ट्राला नवीन सरकार देण्याची आवश्यकता आहे. लवकरच सरकार स्थापन करु असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पण विशेषत: या प्रतिक्रियेवेळी मुख्यमंत्र्यांनी महायुतीचा उल्लेख टाळल्याचं दिसून आलं. त्यामुळे राज्यात सरकार कुणाचे स्थापन होणार याबाबत आणखी गूढ वाढलं आहे.
तसेच सत्ता स्थापनेवर बरेच जण बोलत आहेत. मात्र आम्ही त्यावर बोलणार नाही, भाजपाकडूनही कोणतीही प्रतिक्रिया येणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात ४० मिनिटे चर्चा झाली. यावेळी फक्त देवेंद्र फडणवीस आणि अमित शहाच उपस्थित होते. त्यामुळे राज्यात भाजपा-शिवसेना यांच्यातील तणाव वाढत चालल्याचं दिसून येत आहे. संध्याकाळी सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात भेट होणार आहे. या भेटीनंतर आघाडीची भूमिका स्पष्ट होईल त्यामुळे भाजपादेखील या सर्व घडामोडींवर लक्ष ठेऊन आहे. त्यामुळे आणखी काही काळ वेळकाढूपणाची भूमिका भाजपाने घेतल्याचे दिसतंय.
यावेळी अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीवर चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. महाराष्ट्रात प्रचंड मोठा अवकाळी पाऊस झाला, ऑक्टोबरच्या शेवटच्या दोन आठवड्यात पडलेल्या पावसामुळे ३२५ तालुक्यातील शेतकऱ्यांना फटका बसला, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदतीची अपेक्षा आहे. संपूर्ण नुकसानीचा आढावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर ठेवला. केंद्राने महाराष्ट्राला मदत करावी अशी मागणी अमित शहांना केली. ५० लाख शेतकऱ्यांनी विमा काढला आहे त्या विम्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी प्रयत्न करावेत. यावर स्वत: पीक विमा कंपन्यांसोबत अमित शहा बैठक घेऊन पीक विमा कंपन्यांना निर्देश देणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.