मुंबई : विधानसभा निवडणुकीचा उत्साह शिगेला पोहोचला असताना विविध माध्यमांतून आता ‘पंचरंगी’ जाहिरातींचा मतदारांवर मारा सुरू आहे. त्यातच निवडणूक प्रचारासाठी काँग्रेसचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची जाहिरात टीव्हीवर सुरू आहे. या जाहिरातीमधील ‘मुख्यमंत्री’ पदाच्या उल्लेखावर सर्व स्तरातून टीका झाल्यामुळे या दृश्यफितीतून हे पद बंद करण्यात आले आहे.‘महाराष्ट्र सरकारचा प्रत्येक दिवस, प्रत्येक तास लोकांसाठी’ अशा आशयाची पृथ्वीराज चव्हाण यांची कारकीर्द दाखविणारी एक जाहिरात तयार केली आहे. या जाहिरातीत एका दृश्यात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री म्हणून स्वाक्षरी करताना दाखविण्यात आले आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा काढून घेतल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी राजीनामा दिला, असे असूनही जाहिरातीत पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री म्हणून स्वाक्षरी करत आहेत. हे चुकीचे असून आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन आहे, अशी तक्रार निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने याची दखल घेत ज्या दृश्यात पृथ्वीराज चव्हाण स्वाक्षरी करताना दिसत आहेत, त्या स्वाक्षरीखालील ‘मुख्यमंत्री’ महाराष्ट्र लिहिलेले पद पुसट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
टीकेनंतर ‘मुख्यमंत्रिपद’ जाहिरातीमधून गायब!
By admin | Published: October 10, 2014 3:02 AM