मंत्री सत्तारांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांचं उत्तर, राष्ट्रवादीचा नेता लक्ष्य; उद्धव ठाकरेंनाही प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 06:29 PM2022-12-26T18:29:41+5:302022-12-26T18:30:18+5:30

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरील गंभीर आरोपावर उत्तर देताना एकनाथ शिंदेंनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर पलटवार केला.

Chief Minister Eknath Shinde's reply to Minister Abdul Sattar's resignation, NCP leader Lakshya; Reply to Uddhav Thackeray too | मंत्री सत्तारांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांचं उत्तर, राष्ट्रवादीचा नेता लक्ष्य; उद्धव ठाकरेंनाही प्रत्युत्तर

मंत्री सत्तारांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांचं उत्तर, राष्ट्रवादीचा नेता लक्ष्य; उद्धव ठाकरेंनाही प्रत्युत्तर

Next

नवी दिल्ली - हिवाळी अधिवेशनात आजच्या दिवशी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर विरोधकांनी गंभीर आरोप केले आहेत. विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मंत्री सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच, ३७ एकर गायरान भूखंड बेकायदेशीरपणे देऊन पदाचा दुरुपयोग करून निर्णय घेतल्याप्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा व त्यांची चौकशी करण्याची मागणी आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही सभागृहात केली. दोन्ही सभागृहाच्या विरोधी पक्षांनी सत्तारांना लक्ष्य केलं आहे. याप्रकरणी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भूमिका स्पष्ट केली. राजधानी दिल्ली येथे पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवरही पलटवार केला.  

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरील गंभीर आरोपावर उत्तर देताना एकनाथ शिंदेंनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर पलटवार केला. राजीनाम्या मागणी होत आहे, यावर बोलताना, आम्ही सत्तार यांच्यासंदर्भातील प्रकरणाची माहिती घेऊ, विरोधी पक्षनेत्यांच्या प्रकरणाचीही माहिती घेऊ, असे म्हणत एकप्रकारे अजित पवार यांना लक्ष्य केलं आहे. तसेच, विरोधकांची आणि सत्ताधाऱ्यांचीही माहिती घेऊ, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले. 

सीमाप्रश्नी सभागृहात ठराव आणणार

राजधानी दिल्लीत आज वीर बाल दिवस साजरा केला जात होता, त्या कार्यक्रमासाठी मी दिल्लीत आलो होतो. गुरु गोविंद सिंग यांची दोन मुले ज्याचं वयाच्या ६ आणि ९ व्या वर्षी बलिदान झालं, त्यांचे स्मरण म्हणून केंद्र सरकारने २६ डिसेंबर हा वीर बाल दिवस म्हणून घोषित केला. महाराष्ट्र आणि पंजाबचं जे नातं आहे, त्यामुळेच मला येथे बोलविण्यात आलं होतं. बोलणाऱ्यांनी अगोदर माहिती घ्यायला हवी होती, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर पलटवार केला. सीमाप्रश्नावर जेल भोगलेला एकनाथ शिंदे आहे, त्यामुळे या प्रश्नासंदर्भात इतर लोकांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही. हे सरकार सीमावासियांच्या पाठिशी आहे, तसा ठरावदेखील आम्ही विधिमंडळ सभागृहात आणणार आहोत, असेही शिंदेंनी स्पष्ट केले. 

काय म्हणाले अंबादास दानवे

२८९ अनव्ये विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सदर प्रकरण सभागृहाच्या निदर्शनास आणले. रत्नागिरी, औरंगाबाद, नागपूर अशा अनेक ठिकाणी सत्तार यांनी न्यायालयाचे आदेश डावलून मनमानी पद्धतीने भूखंड, वाळूचे ठेके, कृषी उत्पन्न बाजार समितीची जमीन आपल्या अधिकार कक्षात नसतांना विकल्याचा किंवा वाटप केल्याचा आरोप केला. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने देखील सत्तार यांना फटकारले होते याचा उल्लेख देखील दानवे यांनी केला. अशा मंत्र्यांचा राजीनामा तात्काळ घेतला पाहिजे, तसेच सभागृहात यावर चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी दानवे यांनी केली.

Web Title: Chief Minister Eknath Shinde's reply to Minister Abdul Sattar's resignation, NCP leader Lakshya; Reply to Uddhav Thackeray too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.