रांची - झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर मुंबईतील एका मॉडेलने केलेल्या बलात्काराच्या आरोपाने राज्यात खळबळ उडाली आहे. त्यानंतर, विरोधी पक्षातील नेत्यांनी सोरेन यांच्यावर टीकांचा भडीमार सुरू केलाय. हेमंत सोरेन यांना घेरण्यासाठी भाजपा नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात ट्विट करण्यात येत आहे. त्यातूनच, ट्विटरवर #RapeAccusedCM नावाने हॅशटॅग ट्रेंड झाला आहे.
हरयाणाचे भाजपा नेते अरुण यादव यांनी ट्विट करुन काँग्रेसवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. काँग्रेस अल्पसंख्यांकांच्या हिताचा विचार करणार असल्याचं निवडणुकांवेळी सांगते. मग, आता ज्या सरकारचे मुख्यमंत्रीच बलात्काराचे आरोपी आहेत, तेव्हा काय करणार? असा प्रश्न यादव यांनी विचारला आहे. तसेच, ट्विटरवरुन कार्यकर्त्यांना हेमंत सोरेन यांच्याविरुद्ध जास्तीत जास्त ट्विट आणि रिट्विट करण्याचं आवाहनही केलंय. हा ट्रेंड ट्विटरवर राहू द्या, असंही सूचवलंय.
भाजपाचे दुसरे नेता विकास प्रितम सिंह यांनीही ट्विटरवर हेमंत सोरेन यांना लक्ष्य केलंय. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी इतिहास रचला आहे, ज्यामुळे कुणी त्यांच्याजवळही जाऊ इच्छित नाही. बलात्कार प्रकरणात आरोपी असतानाही ते राज्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत विराजमान आहेत, असा खोचक टोलाही त्यांनी लगावलाय. तसेच, भाजपा नेत्यांनी हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राजीनाम्याचेही ट्विट मोठ्या प्रमाणात होत आहेत.
काय आहे प्रकरण
दरम्यान, काही दिवसांपूर्वी महिला आयोगने सन 2013 साली मुंबईतील एका मॉडेल अभिनेत्रीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाची चौकशी सुरू केली. एनसीडब्लूच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस महासंचालकास चिठ्ठी लिहिली आहे. याप्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि सुरेश नागरे यांच्यावर मॉडेल अभिनेत्रीवर बलात्कार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 2013 साली हेमंत सोरेन आणि सुरेश नागरे यांनी मुंबईतील मॉडेलवर बलात्कार केला, तसेच यासंदर्भात कुठेही वाच्यता न करण्याची धमकीही दिली होती.
पीडिताची चिठ्ठी व्हायरल
याप्रकरणातील पीडित अभिनेत्रीची चिठ्ठी व्हायरल झाली आहे. त्यामध्ये गेल्या 7 वर्षांपासून होत असलेल्या अन्यायाची माहिती देण्यात आली असून पोलिसांनीही तक्रार घेतली नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी लक्ष घातले असून मुंबई पोलीसच्या महासंचालकांना पत्र लिहून चौकशी संदर्भात सूचवले आहे.