हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी आपल्या कुटुंबाची ५९ कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. त्यांच्या कुटुंबावर २५ कोटी रुपयांचे कर्ज आहे, तसेच केसीआर यांच्याकडे स्वत:च्या मालकीची कार नसल्याचे तसेच ते शेतकरी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. राज्यात ३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना केसीआर यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केले. तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी केलेल्या आंदोलनात त्यांच्यावर दाखल झालेल्या नऊ खटले निकालाविना अद्याप प्रलंबित आहेत. आपल्यावर एकही फौजदारी खटला नाही किंवा कोणत्याही खटल्यात शिक्षा सुनावण्यात आली आलेली नाही. (वृत्तसंस्था)
पत्नीकडे ७ कोटींची जंगम मालमत्ताकेसीआर यांच्या पत्नी शोभा यांच्या नावे ७ कोटी तसेच त्यांच्या अविभक्त कुटुंबांकडे ९ कोटींची जंगम मालमत्ता आहे. शोभा यांच्याकडे २.८१ किलोचे सोन्याचे दागिने, हिरे तसेच १.५ कोटी रुपयांच्या अन्य मौल्यवान वस्तू आहेत. केसीआर यांच्या नावे ८.५० कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. आयकर परताव्यात दर्शविल्याप्रमाणे केसीआर यांचे ३१ मार्च २०२३ पर्यंतचे उत्पन्न १.६० कोटी रुपये आहे.
मुलाच्या कुटुंबाकडे ५४ कोटींची संपत्ती केसीआर यांचे पुत्र व बीआरएसचे कार्याध्यक्ष के. टी. रामाराव व त्यांच्या कुटुंबीयांकडे ५४.२७ कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. के. टी. रामाराव यांच्याकडे १०.४ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता पत्नी शैलिमा यांच्याकडे २६.४ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता, ७.४२ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता व ४.५ किलो सोने आहे.