- आदेश रावल
नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर नाराज आहेत. यात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्रीही येतात. काँग्रेस पक्ष ज्याला मुख्यमंत्री म्हणून संधी देतो, तो स्वत:चा समर्थक गट बांधण्याचा प्रयत्न करतो. काँग्रेसची संघटना आणि कार्यकर्त्यांना तो आपले समजत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
नुकतेच युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने राहुल गांधी यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी ही नाराजी बोलून दाखवली. “काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत ही मोठी समस्या आहे, परंतु आगामी काळात ती दूर करण्यात येईल. पक्ष एकाच वेळी अशा नेत्यांविरुद्ध कारवाई करू शकत नाही, परंतु हळूहळू ही समस्या दूर करण्यासाठी ‘लस’ शोधण्याचे काम सुरू झाले आहे,” असे ते म्हणाले.
नुकत्याच झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीतही राहुल गांधी यांनी ‘निवडणुका हारो किंवा जिंको, परंतु कार्यकर्ता तगला पाहिजे’ अशी भूमिका मांडली होती.