Abhishek Banerjee : कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्येप्रकरणी संपूर्ण देशात संताप व्यक्त होत आहे. या घटनेवरुन राजकारण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि लोकसभा खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या अल्पवयीन मुलीला बलात्काराच्या धमक्या मिळाल्या आहेत. या प्रकरणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती अभिषेक बॅनर्जी यांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला १० कोटी रुपयांचे बक्षीस देणार असल्याचे म्हणत आहे. पश्चिम बंगाल बाल हक्क संरक्षण आयोगाने या व्हिडिओची स्वत:हून दखल घेतली आहे.
कोलकात्याच्या आरजी कार कॉलेजमध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या क्रूरतेचा निषेध थांबत नाहीये. मात्र आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांच्या मुलीला बलात्काराची धमकी मिळाली आहे. अभिषेक बॅनर्जी यांच्या ११ वर्षांच्या मुलीला बलात्काराची धमकी देण्यात आली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये रॅलीत सहभागी झालेला एक व्यक्ती ही लज्जास्पद गोष्टी बोलताना ऐकू येत आहे. हे प्रकरण गांभीर्याने घेत पश्चिम बंगाल बाल हक्क संघटनेने कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.
अभिषेक बॅनर्जी हे टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अभिषेक बॅनर्जीही डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणावरुन विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. या सगळ्या प्रकरणात एका व्यक्तीने अभिषेक बॅनर्जी यांच्या मुलीवर अत्याचार करण्याबाबत भाष्य केलं आहे. कोलकाता घटनेचा निषेध रॅलीदरम्यानचा हा व्हिडीओ आहे. या सभेत एक व्यक्ती अभिषेक बॅनर्जी यांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देत असून त्याने असे करणाऱ्याला १० कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
बाल हक्क आयोगाने या प्रकरणात कारवाईचे आदेश दिले आहेत. "अशा घाणेरड्या हेतूने आणि सार्वजनिक ठिकाणी असभ्य टिप्पणी केल्याने अल्पवयीन मुलीच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. हे तिची सुरक्षितता धोक्यात आणण्यासारखे आहे. या संदर्भात, पोलिसांना पोस्को कायद्यांतर्गत कारवाई करण्यास सांगितले आहे. प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या दुःखद निधनाने संपूर्ण राज्य शोक करत आहे. अशा स्थितीत स्कोअर सेटल करण्यासाठी दुसऱ्या बलात्काराची धमकी देणे हे कायद्याचे उल्लंघन आहे. याबाबत दंडात्मक पावले उचलली नाहीत, तर समाजात धोकादायक संदेश जाईल. संबंधित अल्पवयीन मुलीसह इतर मुलींनाही धोका असू शकतो," असे आयोगाने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
बाल हक्क संघटनेने याप्रकरणी पोलिसांना दोन दिवसांत कारवाईचा अहवाल देण्यास सांगितले आहे. दुसरीकडे या व्हायरल व्हिडिओवर तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डेरेक ओब्रायन संतापले आहेत. 'तुमच्या घाणेरड्या युक्त्यांद्वारे आमच्याशी राजकीय संघर्ष करत रहा. तुम्ही यापूर्वीही हेच करत आहात. पण आज मर्यादा ओलांडली आहे. गुंडगिरी करणे थांबवा. आमच्या राष्ट्रीय सरचिटणीसांच्या मुलीला अशा पातळीवर दिलेल्या धमक्यांचा निषेध करण्यासाठी शब्द नाहीत. हे सर्व थांबले पाहिजे, असं डेरेक ओब्रायन यांनी म्हटलं आहे.