ऐझॉल : विधानसभेच्या निवडणुकीसाठी सरछिपमधून अर्ज भरण्यासाठी गेलेले मुख्यमंत्री लाल थनहवला यांना मंगळवारी तो सादर न करताच परतावे लागले. मिझोरमचे मुख्य निवडणूक आयुक्त बी. एस. शशांक यांच्याविरोधात सध्या प्रत्येक निवडणूक कार्यालयासमोर निदर्शने सुरू असून, त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी आपला अर्ज सादर न करण्याचा निर्णय घेतला.मुख्यमंत्री अर्ज भरायला गेले, तेव्हा तेथे कोणीही अडवले नाही. स्वत: मुख्यमंत्र्यांनीच आपला अर्ज निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर न करण्याचा निर्णय घेतला, असे सरकारी अधिकाºयाने सांगितले. निवडणूक कार्यालयाबाहेरील परिस्थिती पाहून ते स्वत:हून निघून गेले, असे हा अधिकारी म्हणाला. मिझोरममधील ४० जागांसाठी अर्ज सादर करण्याची मुदत ९ नोव्हेंबर आहे. म्हणजे त्यासाठी केवळ दोनच दिवस शिल्लक आहेत. मतदान २८ नोव्हेंबर रोजी होणार असून, मतमोजणी ११ डिसेंबर रोजी होईल. सध्याच्या विधानसभेची मुदत १५ डिसेंबर रोजी संपत आहे.मुख्य निवडणूक अधिकारी बी. एस. शशांक यांच्या ब्रू समुदायातील सुमारे ११ हजार लोकांना मतदान करू देण्याच्या निर्णयास मिझोरममधील अनेक संघटनांचा विरोध आहे. लोकसभेच्या वेळी ब्रू समुदायाच्या लोकांनी मतदान केले होते. त्यामुळे आताही आपणास मतदान करू द्यावे, अशी त्यांची मागणी असून, त्यांना तो अधिकार देऊ नये, असे संघटनांचे म्हणणे आहे; पण शशांक यांनी त्यांना मतदानाचा अधिकार दिल्याने त्यांनाच आता हटवावे, अशी मागणी सुरू झाली आहे. त्यासाठी प्रत्येक निवडणूक कार्यालयासमोर निदर्शने केली जात आहेत. बी. एस. शशांक यांनी राज्याचे प्रधान सचिव (गृह विभाग) यांना निवडणूक कामातून काढल्याचाही राग या संघटनांनी व्यक्त केला आहे. (वृत्तसंस्था)सरकारचीहीतीच भूमिकाशशांक यांना हटवा, अशी विनंती मुख्यमंत्री लाल थनहवला यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. त्यांना न हटवल्यास लोकांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल. त्यांच्यावर मिझोरममधील जनतेचा अजिबात विश्वास राहिलेला नाही, असेही या पत्रात त्यांनी नमूद केले आहे. ईशान्य भारतातील मिझोरम हे एकमेव राज्य सध्या काँग्रेसकडे आहे.
निवडणुकीचा अर्ज न भरताच परतले मिझोरमचे मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2018 6:08 AM