Bihar News: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) राज्यात एनडीएचे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली. येत्या 12 फेब्रुवारीला नवीन एनडीए सरकारची फ्लोर टेस्ट आहे. नितीशकुमार यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. अशा वेळी नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयाने या भेटीचे फोटो शेअर केले आहेत.
बिहारमध्ये जागावाटप होणार आहे
लोकसभा निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये एनडीएमध्ये जागावाटप होणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत जेडीयू आणि भाजप एकत्र लढले होते. बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा आहेत. जेडीयू आणि भाजपने प्रत्येकी 17 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. यात भाजपने 17 तर जेडीयूने 16 जागा जिंकल्या होत्या. आता पुन्हा एकदा दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, नितीशकुमार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचीही भेट घेऊ शकतात.
पंतप्रधान मोदींनी नव्या सरकारचे केले अभिनंदन
बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपसोबत पुन्हा सरकार स्थापन केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांचे अभिनंदन केले होते. यावर नितीश कुमार म्हणाले होते की, "मी माझ्या आणि बिहारच्या सर्व जनतेच्या वतीने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन आणि शुभेच्छांबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. बिजनता ही गुरु आहे आणि त्यांची सेवा करणे, हे आमचे मूळ उद्दिष्ट आहे. केंद्रात आणि राज्यात एनडीए आघाडीचे सरकार आल्याने विकास कामांना चालना मिळेल आणि जनतेचे कल्याण होईल."