रघुनाथ पांडे, नवी दिल्लीकोणालाही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून निवडणूकपूर्व ‘प्रोजेक्ट’ करीत बसण्यापेक्षा पक्षाचे संख्याबळ वाढवा. तुम्ही आमदार निवडून आणा, आम्ही दिल्लीतून मुख्यमंत्री ठरवू, अशा शब्दांत महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना कानपिचक्या देतानाच पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेलाही सूचक इशारा दिला आहे. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करून वाद होतील, त्यापेक्षा आपण मुख्यमंत्री महायुतीचा होईल हेच सांगत असलो तरी, तो भाजपाचा कसा राहील हे पाहणे अधिक महत्त्वाचे आहे. मुख्यमंत्री कोणाला करावे, ती नावे पक्षाकडे आहेत असे सांगताना शहा यांचा शिवसेनेवर न बोलता कुरघोडी करण्याचा मानस अधोरेखित झाला आहे. भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष राहिलाच पाहिजे त्यासाठी कोणतीही कसर सोडू नका. हवी ती मदत केंद्र व भाजपाच्या ताब्यातील राज्यांकडून देतो, शहर, वॉर्ड आणि गल्लीनिहाय व्यूहरचना आखा पण यश काबिज करा, निवडणुकीच्या कामात हयगय सहन केली जाणार नाही. उत्तरप्रदेशचा फॉर्म्युला राज्यात वापरायचा आहे, त्यासाठी स्थानिक पातळीवर कोणते बदल करायचे ते सांगा, तसे करू पण संख्या वाढलीच पाहिजे, जागावाटपाचा निर्णय महायुतीच्या बैठकीत घेऊ. पण लेचीपेची भूमिका घ्यायचीच नाही, असेही शहा यांनी स्पष्टपणे सांगितले. ज्या राज्यात या वर्षीत निवडणुका होणार आहेत, तेथील पदाधिकाऱ्यांना शहा यांनी भेटीला बोलविले होते. शहा पक्षाध्यक्ष झाल्यांतर पहिल्यांदाच प्रदेश भाजपाचे नेते त्यांना भाजपा मुख्यालयात भेटायला आले होते.झारखंडनंतर सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्रातील नेत्यांना त्यांनी बोलविले. एकूण १८ नेत्यांना त्यांनी बोलविले होते. त्यापैकी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे उपस्थित नव्हते. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार,आमदार पंकजा मुंडे, अतुल भातखळकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. आमदारांचे परफॉर्मींग आॅडिट करण्याचे त्यांनी सांगितले. आमदारांच्या अ ते ड अशी श्रेणी करण्याची सूचनाही केली. राज्यातील आघाडी सरकारचे १५ वर्षातील अपयश लोकांसमोर मांडणे हाच आपला अजेंडा असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्रीपद भाजपाच पेलेल!
By admin | Published: July 16, 2014 2:52 AM