ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. २० - माझ्यामागे असलेल्या अनेक मंत्र्यांना धमक्यांचे फोन आले होते, मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार जनता दलाने केला आहे. या सगळ्या प्रकाराला विटून माझ्याकडे बहुमत असलं तरी मी राजीनामा दिला असल्याचा दावा बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी केला आहे. मला १४० आमदारांचा पाठिंबा असून जर गुप्त मतदान घेतलं गेलं तर माझा पाठिंबा सिद्ध होईल असेही मांझी म्हणाले.
पत्रकारांशी बोलताना, नितिशकुमार यांनी मला मुख्यमंत्री केले परंतु मी तर केवळ प्यादं होतो आणि नितिशकुमारांना हव्या असलेल्या बदल्या होत होत्या, नियुक्त्या होत होत्या, मंत्रिमंडळाचे निर्णय झाले असा गौप्यस्फोट मांझी यांनी केला आहे. नितिशकुमार यांच्या भोवताली असलेल्या काही नेत्यांनी पैशाच्या व गुंडगिरीच्या जोरावर सगळा खेळ रचल्याचे सांगत, चांगलं काम करण्याची संधी मला मिळालीच नसल्याचे सांगितले. दलित लोक विकासाची कामं करू शकत नाहीत, त्यांच्यात पात्रताच नाही अशा वावड्या पक्षातल्याच काही लोकांनी उठवल्या आणि मला काम करण्यास अटकाव करण्यात आल्याचे मांझी म्हणाले.
नितिशकुमार माझ्या मनात आदरस्थानी होते. परंतु तेही लोकांच्या बहकाव्यात आल्याचा आरोप मांझी यांनी केला आहे. जितनराम मांझी चांगलं काम करत नसेल तर माझ्या तोंडावर सांगायचं मी लगेच राजीनामा दिला असता. परंतु, द्रौपदीचं चिरहरण झालं त्यावेळी भीष्म पितामह जसे बघत राहिले त्याप्रमाणेच नितिशकुमार माझा अपमान बघत राहिले असे मांझी म्हणाले. मला काढून नितिशकुमारांना मुख्यमंत्री करण्याचे शरद यादव यांनी सांगितले. परंतु, माझा गुन्हा काय ते तर सांगा असे मी विचारले असता माझ्या अपरोक्ष त्यांनी बैठक बोलावली आणि मला मुख्यमंत्रीपद सोडण्यास सांगून अपमान केल्याचे मांझी म्हणाले.
माझ्याशी व माझ्या पाठिराख्यांशी जनता दलाचे नितिशकुमारांच्या भोवती असणारे काही नेते अत्यत हीन दर्जाचे वागले असल्याची टीका मांझी यांनी केली आहे. मात्र, अनेकांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्यावर हिंसाचार टाळण्यासाठी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे न जाता राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे जितनराम मांझी यांनी सांगितले.