मुख्यमंत्री चाैहान यांनी लघुशंका घटनेतील पीडिताचे धुतले पाय; माफीही मागितली, आरती केली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 06:46 AM2023-07-07T06:46:05+5:302023-07-07T06:46:22+5:30
शिवराज यांनी शाल देत त्याचा सन्मान केला. ते म्हणाले, या घटनेने दु:ख झाले आहे.
- अभिलाष खांडेकर
भोपाळ : भाजपच्या माथेफिरू नेत्याने एका आदिवासी व्यक्तीवर लघुशंका केल्यामुळे देशभरातून टीका झाली. त्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पीडित तरुणाला मुख्यमंत्री निवासस्थानी बोलावून घेत घरामध्ये आणून खुर्चीवर बसवले, त्यानंतर पाय धुतले, आरती केली आणि तिलकही लावले.
शिवराज यांनी शाल देत त्याचा सन्मान केला. ते म्हणाले, या घटनेने दु:ख झाले आहे. मी तुमची माफी मागतो. तुमच्यासारखे लोक माझ्यासाठी देवासारखे आहेत. दुसरीकडे जे झाले ते झाले, असे आदिवासी तरुणाने सांगितले. त्यांनी या तरुणाला ‘सुदामा’ हाक यावेळी मारली आणि म्हणाले की, “दशमत, तू आता माझा मित्र झाला आहेत. यादरम्यान चौहान यांनी त्याच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
आरोपी प्रवेश शुक्ला याला मंगळवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. त्याच्यावर एनएसए लावण्यात आला असून, तो सध्या तुरुंगात आहे.
दोन दलितांना मारहाण
मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यातील दोन दलित तरुणांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी ही घटना मानवतेसाठी लज्जास्पद असल्याचे म्हटले. या प्रकरणी आरोपींविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या आरोपींच्या घरावरही बुलडोझर चालवण्यात येणार आहे.
पत्नी म्हणाली पैशाचा मोह नाही
शिवराज सिंह चौहान यांनी पीडितेच्या पत्नी सांगितले की, तुम्हाला घर घ्यायचे आहे, व्यवसायासाठी मदत करायची आहे. यावर पीडितेच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांना सांगितले की, आम्हाला पैशाचा मोह नाही, आमचा माणूस आमच्याकडे पाठवून द्या.