बंगळुरू: तुमच्या कारच्या बोनेटवर कावळा बसला तर तुम्ही काय कराल? बहुदा त्या कावळ्याला पळविण्याशिवाय काहीच नाही. परंतु या महिन्याच्या प्रारंभी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांच्या कारवर कावळा बसल्यानंतर त्यांच्यासाठी नवीन टोयोटा फॉर्च्युनर खरेदीचा आदेश निघाला आहे.एकेकाळी अंधविश्वासविरोधी कायद्याचे कट्टर समर्थक राहिलेले सिद्धरमय्या यांच्या या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. मुख्यमंत्र्यांनी टोयोटा फॉर्च्युनरच्या टॉप मॉडेल खरेदीचे आदेश दिले असून, या कारची किंमत ३५ लाखांच्या घरात आहे. अर्थात हा सर्व पैसा सर्वसामान्य करदात्यांच्या खिशातून जाणार आहे. या घटनेची राज्यातील माध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.गेल्या २ जून रोजी मुख्यमंत्र्यांची गाडी त्यांचा सरकारी बंगला ‘कृष्णा’च्या आवारात उभी असताना कारच्या बोनेटवर एक कावळा बसला होता. मुख्यमंत्री निवासस्थानातील कर्मचाऱ्यांनी या कावळ्याला पळवून लावण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु तो जागेवरून हटला नाही. योगायोग म्हणजे त्याच काळात सिद्धरमय्या सरकारसमक्ष सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचे आव्हान उभे ठाकले होते आणि पोलिसांनीही सामूहिक सुटीची धमकी दिली होती. मग काय? मुख्यमंत्र्यांच्या खूशमस्कऱ्यांनी गाडीवर कावळा बसल्यानेच अशुभ घडत असल्याचा जावईशोध लावून त्यांना गाडी बदलण्याचा सल्ला दिला. एरवी अंधश्रद्धेला विरोध करणारे सिद्धरमय्याही त्याला बळी पडले. दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाने मात्र कावळा बसल्याच्या कारणावरून गाडी बदलण्यात आल्याचा इन्कार केला आहे. गाडी तीन वर्षे जुनी झाली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसाठी नवी कार खरेदी करणे आवश्यक होते, असा युक्तिवाद त्यांनी केला. (वृत्तसंस्था)
>आधी केला होता अंधविश्वासाला विरोध विशेष म्हणजे सिद्धरमय्या यांनी भूतकाळात अशाप्रकारच्या अंधविश्वासाला विरोध केला होता. अलीकडच्याच काळात एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याने त्यांना ४ जुलैला अमावस्या असल्याने विधानसभेचे सत्र या दिवशी न बोलावण्याचा सल्ला दिला असता मुख्यमंत्र्यांनी तो फेटाळला होता. अमावस्या आली तर काय झाले, आपण या गोष्टींवर कसा विश्वास ठेवता, असे सवाल करून त्याच दिवशी सत्र बोलावण्यास सांगितले होते.