आदेश रावल/ बलवंत तक्षकलोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राज्यसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसचेहिमाचल प्रदेशमधील सरकार अडचणीत सापडले आहे. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून काँग्रेस नेतृत्वाने हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना सिमल्यात पाठविले आहे.
आमदारांचे मत जाणून घेतल्यानंतर दोन्ही नेते गुरुवारी सायंकाळपर्यंत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना आपला अहवाल सादर करतील. कॅबिनेट मंत्री विक्रमादित्य सिंह यांनीही बुधवारी सकाळी राजीनामा दिला. मंगळवारी राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर विक्रमादित्य सिंह यांनी पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना फोन करून सांगितले होते की, मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्यासोबत एक दिवसही काम करू शकत नाही.
उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री आणि प्रतिभा सिंह यांनी पक्ष नेतृत्वाला सांगितले आहे की, आमच्यापैकी कुणाकडेही मुख्यमंत्रिपद दिले तर बंडखोर आमदारही परत येतील. सहा नाराज आमदारांपैकी तीन आमदारांनी प्रभारी राजीव शुक्ला यांना फोन करून सांगितले आहे की, सुखविंदर सिंह सुक्खू यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवा. आम्ही परत येण्यास तयार आहोत. नाराज आमदार हरयाणाच्या पंचकुला येथे आहेत. हरयाणात भाजपचे सरकार आहे.
विक्रमादित्य सिंह यांचा राजीनामा मागे हिमाचल प्रदेशचे मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी आपला राजीनामा मागे घेतला आहे. ही माहिती काँग्रेसचे खासदार राजीव शुक्ला यांनी दिली आहे. त्यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाचे निरीक्षक हिमाचल प्रदेशमध्ये दाखल झाले असून त्यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांशी चर्चा केली. तसेच विक्रमादित्य सिंह यांनी राजीनामा स्वीकारणार नाही असे मुख्यमंत्री सुखविंदरसिंह सुक्खू यांनी स्पष्ट केले होते. विक्रमादित्य सिंह यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी निरीक्षकांनी केलेली सूचना त्यांनी मान्य केली.