नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर राज्यांच्या मुख्यमंत्रिपदासाठी उमेदवार निवडण्याचे अधिकार रविवारी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना पक्षाच्या संसदीय मंडळाने दिले. मणिपूर राज्यात भाजपला बहुमत नसतानाही सरकार स्थापन करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. संसदीय मंडळाचे चिटणीस आणि केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा वार्ताहरांशी बोलताना म्हणाले की, ‘वरील तीन राज्यांचे निरीक्षक आमदारांशी विचारविनिमय करून अमित शहा यांना अहवाल देतील. त्यातून शहा हे मुख्यमंत्रिपदासाठी उमेदवार निवडतील.’ संसदीय मंडळाच्या बैठकीस पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. शाह यांनी चार राज्यांतील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर सहमती व्हावी यासाठी चर्चा केली.उत्तर प्रदेशसाठी केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू व सरचिटणीस भूपेंद्र यादव निरीक्षक असतील, तर केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर व सरचिटणीस सरोज पांडे हे उत्तराखंडचे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि पक्षाचे उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे मणिपूरला जातील, असे नद्दा म्हणाले. या तीनही राज्यांतील पक्षाच्या विधिमंडळांच्या बैठकीची तारीख अद्याप ठरलेली नाही. उत्तर प्रदेशात पक्षाचे अध्यक्ष केशव प्रसाद मौर्य व केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा हे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत दिसतात. आठ वेळा आमदार असलेले सुरेश खन्ना व केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या नावाबद्दल पक्षातील एका गटाचे नेते मुख्यमंत्रिपदासाठी चर्चा करीत आहेत.
तीन राज्यांचे मुख्यमंत्री अमित शहा निवडणार
By admin | Published: March 13, 2017 4:05 AM