लोकमत न्यूज नेटवर्ककामारेड्डी (तेलंगणा) : तेलंगणा विधानसभा निवडणुकीत कामारेड्डी मतदारसंघात तिरंगी लढत आहे. मात्र, मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) येथून निवडणूक लढवीत असल्याने आणि पक्षाची संघटनात्मक ताकद तसेच तुलनेने कमकुवत विरोधक यामुळे भारत राष्ट्र समितीला (बीआरएस) येथे फायदा होऊ शकतो.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते के. व्यंकट रमन रेड्डी मुख्यमंत्र्यांविरोधात निवडणूक लढवत आहेत. तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. पाच वेळा आमदार असलेले गम्पा गोवर्धन हे या जागेवरून बीआरएसचे आमदार होते; पण राव यांनी कामारेड्डी या जागेवरून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या तिरंगी निवडणुकीत कोण विजयी होईल, याबाबत उत्सुकता लागली आहे.
केसीआर यांचे मूळ गाव केसीआर यांच्यासाठी कामारेड्डी विधानसभा मतदारसंघ हे त्यांचे मूळ गाव आहे. त्यांचा जन्म कोनापूर गावात त्यांच्या आजी-आजोबांच्या घरी झाला होता. त्यांच्या कुटुंबातील सदस्य अजूनही कामारेड्डीमध्ये राहतात आणि त्यांना भक्कम पाठिंबा देत आहेत.
सिंचनाच्या प्रतीक्षेत शेतकरी
भाजपचे उमेदवार रमन रेड्डी यांनी स्थानिक विरुद्ध बाहेरचा असा मुद्दा केला असून कोनापूर गावात प्रचार करताना ते म्हणाले की, केसीआर जिंकले तर तुम्हाला शेवटी गम्पा यांच्याशी संपर्क साधावा लागेल. मी तुमच्यासाठी सदैव उपलब्ध असेन, हे लक्षात ठेवा आणि निर्णय घ्या.
केसीआर यांच्या विजयामुळे कामरेड्डीतील विकासकामांना चालना मिळेल, अशी आशा परिसरातील अनेकांना आहे. येथील मुख्य समस्या म्हणजे सिंचन साधनांचा अभाव. आपल्या शेतीला पाणी मिळावे, यासाठी शासन काही सिंचन योजना सुरू करेल याची लोकांना प्रतीक्षा आहे.
nकाँग्रेसने माजी मंत्री मोहम्मद अली शब्बीर यांना या जागेऐवजी निजामाबाद शहरी मतदारसंघातून मैदानात उतरविले आहे. nदुसरीकडे भाजपने एका स्थानिक उमेदवाराला मैदानात उतरविले आहे. त्यांनी २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत १५ हजार मतांसह तिसऱ्या स्थानावर होते.