नवी दिल्ली - मी लोकप्रतिनिधी असून माझी सर्वात आधी बांधिलकी मतदारसंघातील जनतेशी आहे. मी शिवसेनेच्या चिन्हावर जरूर निवडून आलो पण तेव्हा शिवसेना-भाजपा एकसंघपणे मला ताकद देण्यासाठी होती. महाविकास आघाडी अनैसर्गिक युती आहे असं नाना पटोले म्हणतात. हाच धागा प्रत्येक शिवसैनिकांच्या मनात होता. स्थानिक पातळीवर शिवसंपर्क अभियानातून शिवसैनिकांच्या भावना संपवून घेतल्या. शिवसैनिकांमध्ये प्रचंड खदखद होती. त्या भावना नेतृत्वापर्यंत पोहचवल्या परंतु काही कारणास्तव निर्णय झाला नाही. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी वाट करून दिली. त्यातून नवीन समीकरण तयार झाले असं खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले.
धैर्यशील माने म्हणाले की, मतदारसंघात निधीचा तुटवडा निर्माण झाला होता. आता राज्य आणि केंद्र सरकार एकत्र आल्याने मतदारसंघात जास्तीत जास्त निधी मिळेल याच भावनेतून अनेक लोकप्रतिनिधी इकडे आले. माझ्या मतदारसंघात सुचवलेली जी कामे होती त्यातील केवळ एकच काम पर्यावरण खात्यामार्फत झाले. ठाकरे कुटुंब माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आदित्य ठाकरेंनी प्रयत्न केले असतील परंतु तीन पक्षाचे सरकार असल्याने कामाचं प्रत्यक्षात निकाल येऊ शकला नाही. राजकारणापलीकडचा जिव्हाळा असल्याने भावूक होतोय. ज्या भावना आमच्या आहेत त्याच ठाकरेंच्या आहेत. आजची परिस्थिती संपावी यासाठी मी काम करत होतो. आयुष्यभर कृतज्ञता ठाकरे कुटुंबीयांशी राहणार आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच ज्यांनी माझ्यावर गद्दारीचा आरोप लावला. गोकुळच्या संचालकपदापासून का वंचित राहावं लागलं. त्यांच्या वेदना मी समजू शकतो. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना नाही तर महाविकास आघाडीला सोडलं. राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीत चौथ्या नंबरचा पक्ष शिवसेना झाला. एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसैनिकामधील खदखद बाहेर आली. काँग्रेस-शिवसेना एकत्र येईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. शिंदे-ठाकरे गट एकत्र यावेत अशी प्रत्येक शिवसैनिकांची भावना आहे असंही धैर्यशील माने यांनी म्हटलं.
दरम्यान, सुरुवातीला द्विधा मनस्थिती होती. एकनाथ शिंदे यांनी कणखर पद्धतीने बळ देण्याचं काम केले. आमच्या भागातील पूरग्रस्तांसाठी मोठा निधी देण्याचं काम मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. मतदारसंघातील लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडून लोकांच्या अपेक्षा आहेत. ९३५ कोटी रुपयांचा निधी सांगली पेठेपासून हायवेला दिला गेला. हातकणंगले मतदारसंघात विकासाला पुढे घेऊन जाण्याचा प्रवास सुरू झाला आहे. अतिशय जोमाने शिंदे-फडणवीस सरकार काम करत आहे. ऑन फिल्ड काम करणारा मुख्यमंत्री आहेत. पूरभागात भरीव मदत करण्याचं काम प्रत्येकवेळी शिंदेंनी केले. संवेदनशील मुख्यमंत्री असल्याने त्याचा फायदा मतदारसंघाला होईल असा विश्वास धैर्यशील माने यांनी व्यक्त केला.