बंगळुरू - उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री बदलल्यानंतर आता कर्नाटकमध्येही येदीयुरप्पा यांच्या उचलबांगडीची मागणी होत आहे. विशेष म्हणजे भाजपा नेत्यांकडूनही येदीयुरप्पा यांना हटविण्याचाी मागणी करण्यात आलीय. भाजपा आमदार बसगौंडा पाटील यत्नान यांनी ही मागणी केली असून राज्यात भाजपला वाचविण्यासाठी आगामी निवडणुकांपूर्वीच बीए येदीयुरप्पा यांना मुख्यमंत्री पदावरुन हटविण्यात यावे, असे त्यांनी म्हटलंय.
राज्यात मुख्यमंत्री बदलण्यात येणार असल्याचं 100 टक्के निश्चित आहे. कारण, सध्याच्या मुख्यमंत्र्यांसमवेत पुढील निवडणुका लढविणे अवघड आहे. भाजपाचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंह यांनाही यासंदर्भात माहिती आहे. मात्र, सहजच ते मुख्यमंत्री बदलण्यात येणार नसल्याचं सांगत आहेत. भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या राजकारणाविरुद्ध आपण आवाज उठवित असल्याचं यत्नान यांनी म्हटलंय. मी केवळ अटलबिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचंच कौतुक करतो. या दोन्ही नेत्यांविरुद्ध भ्रष्टाचाराचे एकही प्रकरण नाही. दोघांनाही घराणेशाहीचं राजकारण कधीच केलं नाही. त्यामुळे, माझ्यासाठी भाजपाचे हे दोन्ही नेते रोड मॉडेल आहेत. त्यामुळे, जे घराणेशाहीचं राजकारण करतात, आणि भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत, त्यांचं समर्थन मी करु शकत नाही, असेही ते म्हणाले.
अन्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. मी भाजपच्या राजकीय भविष्याची लढाई लढत असून मी जनतेचा सेवक आहे. येदीयुरप्पा यांनी दक्षिण भारतातील भाजपचा शेवटचा मुख्यमंत्री बनता कामा नये. कर्नाटकमध्ये पुढील 10 ते 20 वर्षे भाजपाचाच मुख्यमंत्री असायला हवा. त्यासाठी, माझी लढाई सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आदर्शवत असा मुख्यमंत्री कर्नाटकला पाहिजे, असे यत्नाल यांनी स्पष्टपणे सांगितलंय.
3 राज्यात मुख्यमंत्री बदलणार
पाटील यांच्या म्हणण्यानुसार, भाजपा हायकमांड 3 राज्यांत मुख्यमंत्रीपदाचे चेहरे बदलणार आहे. नुकतेच उत्तराखंड येथील मुख्यमंत्री बदलण्यात आला असून आता कर्नाटक आणि हरयाणाची बारी असल्याचंही त्यांनी स्पष्टच सांगितलं. गेल्या अनेक दिवसांपासून या बदलासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे.