अयोध्या : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत दिव्यांची रोषणाई करण्यात येत आहे. अयोध्येतील शरयू घाटाजवळ लाखो दिव्यांनी लखलखीत करण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, 'आधीची सरकारे अयोध्या नावाने घाबरत होती. मात्र, मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर याठिकाणी अनेकदा आलो आहे.'
याचबरोबर, योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले. नरेंद्र मोदींनी राम राज्याची धारणा साकार केली आहे. भारताची सांस्कृतिक परंपरा त्यांनी पुन्हा एकदा जगासमोर आणली आहे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. तसेच, भारत कोणाला डिवचत नाही. पण, कोण डिवचत असेल तर सोडत नाही, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले.
दरम्यान, दिवाळीच्या निमित्ताने अयोध्या 5 लाख 51 हजार दिव्यांनी उजळून निघाली आहे. व्यापारी आणि सामान्य व्यक्तींकडूनही घरापासून शहरांपर्यंत दिव्यांची रोषणाई केली आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचीही टीमसुद्धा अयोध्येत दाखल झाली आहे.
याशिवाय, येथील रामकथा पार्कमध्ये नेपाळ, श्रीलंका, इंडोनेशिया, फिलिपिन्सच्या गटांकडून रामलीलाची महती सांगितली जाणार असून, त्यासाठी लेजर शोच्या माध्यमातून रामकथेचे प्रसंग दाखवले जाणार आहेत. विशेष म्हणजे, योगी सरकारने दीपोत्सव कार्यक्रमासाठी 133 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.