लखनौ - सरकारी अधिकारी उशिरा येतात आणि लवकर निघून जातात, अशी नेहमीच नागरिकांची तक्रार असते. शासकीय कार्यालयात कर्मचारी आणि अधिकारी 10 नंतर येतात आणि 5 वाजण्यापूर्वीच निघून जातात. त्यामुळे नागरिकांना ताटकळत बसावे लागते, शिवाय त्यांच्या उद्धटपणाचा त्रासही सहन करावा लागतो. त्यामुळे उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सकाळी 9 वाजता कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वच मंत्र्यांना तंबी देत, सकाळी 9 वाजता कार्यालयात हजर राहण्याचे बजावले आहे. त्यानंतर, बहुतांश मंत्र्यांनी मोदींच्या या सूचनेचे पालनही केल्याचे पाहायला मिळाले. तर, आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांना कुठल्याही परिस्थितीत सकाळी 9 वाजता कार्यालयात पोहोचण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, संबंधित सर्व सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनाही या नियमाचे पालन करण्याच्या सूचना देण्याचे बजावले. त्यामुळे उत्तर प्रदेशातील सरकारी बाबू आता 9 च्या आत कार्यालयात दिसणार आहेत. अन्यथा, उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही योगी आदित्यनाथ यांनी बजावले आहे. दरम्यान, सरकारी कर्मचारी जेवणासाठी गेल्यास टाईमपास करत बसतात. याचा, नागरिकांनाव विनाकारण त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे, अर्ध्या तासात जेवण उरकून कामावर हजर राहण्याचे आदेश, महाराष्ट्र सरकारने संबंधित कर्मचाऱ्यांना दिले आहेत. विशेष म्हणजे याबाबतचे परिपत्रकही काढण्यात आले आहे.