बासमती तांदळावरून दोन राज्यांचे मुख्यमंत्री आमनेसामने, प्रकरण पंतप्रधानांच्या दरबारात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 03:35 PM2020-08-07T15:35:42+5:302020-08-07T15:39:24+5:30
बासमती तांदळाचे आपले असे खास वैशिष्ट्य आहे. भारत तांदळाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार असून, त्यामध्ये बासमती तांदळाची भागिदारी मोठी आहे.
नवी दिल्ली - आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सुवासासाठी प्रसिद्ध असलेल्या बासमती तांदळावरून सध्या देशातील दोन राज्यांचे मुख्यमंत्री आमनेसामने आले आहेत. बासमती तांदळाच्या जीआय टँगच्या मुद्द्यावरून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यात वाद रंगला आहे. दरम्यान, दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमधील वाद आता पंतप्रधानांच्या कार्यालयापर्यंत पोहोचला आहे.
कडकनाथ कोंबड्यानंतर आता मध्य प्रदेशने बासमती तांदळाच्या जीआय मानांकनावर आपली दावेदारी ठोकली आहे. त्यानंतर या दावेदारीला प्रत्युत्तर म्हणून पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. बासमती तांदळाचे उत्पादन करणाऱ्या विशेष क्षेत्रात मध्य प्रदेशचा समावेश होत नाही. त्यामुळे मध्य प्रदेशला जीआय मानांकन दिल्यास जीआय मानांकनाच्या मूळ उद्देशास हरताळ फासला जाईल, असे अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे.
बासमती तांदळाचे आपले असे खास वैशिष्ट्य आहे. भारत तांदळाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार असून, त्यामध्ये बासमती तांदळाची भागिदारी मोठी आहे. गतवर्षी भारताने ७० लाख टन तांदळांची निर्यात केली होती. बासमती तांदळाच्या उत्पादनात भारतातील उत्तरेकडील पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड, दिल्ली आणि जम्मू-काश्मीर या राज्यांची भागीदारी मोठी आहे. मध्य प्रदेशातील १३ जिल्ह्यांत बासमती तांदळाचे उत्पादन होते. गतवर्षी मध्य प्रदेशात तीन लाख टन बासमती तांदळाचे उत्पादन झाले होते. मात्र मध्य प्रदेशकडे बासमतीसाठीचा जीआय टँग नाही. त्यामुळे सीहोरच्या शरबती गव्हाप्रमाणे येथील बासमतीचा बाजारात दबदबा दिसून येत नाही.