लखनौ - उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजणार आहे. त्या पार्श्वभूमीवर योगी सरकारकडून नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्यात येत असल्याचे प्रकर्षाने जाणवते. नुकतेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अंगणवाडी सेविकांच्या (आशा वर्कर) मानधनात वाढ केली आहे. त्यामुळे, अंगणावाडीत काम करणाऱ्या महिलांना मोठा आधार मिळाला आहे. राज्यातील 3.73 लाख अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या मानधनात ही वाढ झाली आहे.
अंगणवाडी कार्यकर्त्यांना मानधनासह प्रोत्साहनपर भत्ता म्हणून दरमहा 1500 रुपये, मिनी अंगणावाडी कार्यकर्त्यांना 1250 रुपये आणि अंगणवाडी सेविकांना 750 रुपये अधिक मिळणार आहेत. त्यामुळे, अंगणवाडी कार्यकर्ता म्हणजेच आशा वर्कर्संना 7000 रुपये मानधन निश्चित झालं आहे. तर, मिनी अंगणवाडी सेविकांसाठी 5500 मानधन होत असून आशा सेविकांना 4000 मानधन मिळणार आहे.
महिला व बालविकास विभागाच्या प्रमुख सचिव वी हेकाली झिमोमीकडून जारी संबंधित आदेशानुसार व्ही हेकाली झिमोमीच्या जारी आदेशानुसार प्रोत्साहन भत्ता हा मानधनासोबतच जोडला जाईल. त्यानुसार, नवीन मानधन मिळणार आहे. राज्यातील जवळपास 3.73 लाख अंगणवाडी सेविकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गेल्याच महिन्यात अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी, सरकारने 265.70 कोटी रुपयांची बजेटला मंजुरीही दिली आहे.