Ram Mandir PM Modi Sanjay Raut : राम जन्मभूमीचा मुद्दा गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चेत होता. काही महिन्यांपूर्वी या मंदिराचे भूमिपुजन झाले आणि आता २२ जानेवारी २०२४ ला रामलल्ला अयोध्येच्या राममंदिरात विराजमान होणार आहेत. श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: उपस्थित राहणार आहेत. राम जन्मभूमी न्यासाकडून त्यांना अधिकृत निमंत्रण देण्यात आले आहे. या मुद्द्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले होते की, त्यांना निमंत्रण देण्याची काहीच गरज नव्हती. ते स्वत:हून आले असते. यावर आता थेट राम जन्मभूमी न्यासाचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी राऊतांचा समाचार घेतला आहे.
राम जन्मभूमी न्यासाचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास म्हणाले, "प्रत्येक जण आपापल्या वैचारिक पात्रतेनुसार बोलतो. संजय राऊत यांना नेहमी निवडणुकाच दिसतात. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा हा विश्वास, श्रद्धा आणि आस्थेचा प्रश्न आहे. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. राम मंदिराची पायाभरणी आणि भूमिपुजनासाठीही पंतप्रधान मोदी आले होते. यावेळच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रणही मोदींनी स्वीकारले आहे."
"राम मंदिराची नव्याने उभारणी ही बाब बलिदानाशी जोडू नका. हा श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय आहे. राजकारण आणि निवडणुका या गोष्टी येत-जात राहतात, त्याबद्दल फारसा विचार करण्यात काहीच अर्थ नाही. सर्व राजकीय पक्षांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पंतप्रधान मोदींना खुद्द प्रभूश्रीरामाचा आशीर्वाद आहे. म्हणूनच ते सत्तेत आहेत आणि यापुढेही राहतील. जे लोक श्रीरामाचे अस्तित्व आणि देवत्व नाकारतात ते रस्त्यावरच फिरत बसतात आणि त्यांना यापुढेही तेच करत बसावं लागेल."
संजय राऊत काय म्हणाले होते?
राम मंदिराच्या उद्घाटनाच्या मुद्द्यावर बोलताना राऊतांना पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले होते. "पंतप्रधान मोदी यांना अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्याची काहीच गरज नव्हती. ते स्वत:हूनच आले असते. ते देशाचे पंतप्रधान आहेत, त्यामुळे ते नक्कीच हजर राहिले असते. राम मंदिराबद्दलचा इतका मोठा कार्यक्रम कोणी का सोडेल? राम मंदिर बांधणीसाठी हजारो कारसेवकांनी आपल्या प्राण्यांचे बलिदान दिले. सर्व हिंदुत्ववादी संघटना आणि राजकीय पक्ष यात सहभागी होते. शिवसेना, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद सारेच यात सहभागी होते. लालकृष्ण अडवाणी यांनी रथ यात्रा काढली होती. या साऱ्या गोष्टींचा एकत्रित निकाल म्हणजे राम मंदिराची उभारणी आहे. त्यामुळे मोदीजी नक्कीच जातील. पण मला असं वाटतं की आता निवडणुका जवळ आल्यात, त्यामुळे राम मंदिर हा मुद्दा निवडणुकांसाठी वापरला जाणार आहे," असा आरोप राऊतांनी केला.