Ram Mandir Pujari Reaction On RSS Chief Mohan Bhagwat Statement: लोभ, लालूच आणि आकसातून देवतांची होणारी हेटाळणी अमान्य आहे. धर्म हा प्राचीन असून, धर्माच्या अस्मितेतून राम मंदिराची निर्मिती झाली. ती योग्यच आहे. मात्र, मंदिराची निर्मिती होते आहे, म्हणून कोणी हिंदूंचा नेता होऊ शकत नाही, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले होते. यावरून देशभरात गदारोळ होत असलेला पाहायला मिळत आहे. संत-महंत या विधानावरून नाराजी व्यक्त करत असल्याचे दिसत आहे. यातच राम मंदिराचे मुख्य पुजारी असलेल्या महंत सत्येंद्र दास यांनीही याबाबत भूमिका मांडली आहे.
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशभरात मंदिर-मशीद वाद वाढवण्याच्या घटनांबद्दल नुकत्याच केलेल्या विधानावर महाकुंभासाठी आलेल्या साधूसंतांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काही साधूंनी मंदिरांवर पुन्हा दावा केला पाहिजे, अशी भूमिका मांडली तर काहींनी घटनात्मक चौकटींच्या अधीन राहूनच असे प्रश्न सोडवले पाहिजेत, असे म्हटले आहे. गेल्या वर्षभरात देशातील वाराणसी, मथुरा, संभल, भोजपूर, अजमेर अशा विविध ठिकाणच्या मुस्लीम धार्मिक स्थळांवर दावा करणाऱ्या याचिका वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये दाखल झाल्या आहेत.
निर्णायक कृती करण्याची गरज, योगी आदित्यनाथ यांचा दृष्टीकोन योग्य
महंत सत्येंद्र दास १ मार्च १९९२ पासून राम मंदिराचे मुख्य पुजारी आहेत. अयोध्येतील नवीन भव्य राम मंदिरातही ते रामसेवा करत आहेत. मोहन भागवत यांच्या विधानावर भाष्य करताना महंत सत्येंद्र दास यांनी सांगितले की, ऐतिहासिक मंदिरांच्या जागांवर पुन्हा दावा करण्यासाठी निर्णायक कृती करण्याची गरज आहे. हिंदूंचे विस्थापन करून मंदिरे ताब्यात घेण्यात आली होती, असे तपासात आढळले तर त्यांच्यावर पुन्हा दावा करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अशा ठिकाणांची ओळख पटवण्याचा आणि पूजा पुन्हा सुरू करण्याचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दृष्टीकोन योग्य आहे, असे महंत सत्येंद्र दास यांनी नमूद केले.
दरम्यान, अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी सरसंघचालकांच्या राष्ट्रीय सौहार्द कायम राखण्यासंबंधी व्यापक दृष्टीकोनाला पाठिंबा दिला आहे. भारत सध्या आणखी अंतर्गत संघर्ष सहन करण्याच्या परिस्थितीत नाही. आपण मोहन भागवत यांच्या विधानाचे महत्त्व ओळखले पाहिजे. धार्मिक आणि राष्ट्रीय प्रश्न घटनात्मक चौकटीतच सोडवले पाहिजे, आपल्या देशाला पुन्हा नागरी युद्धसदृश्य परिस्थिती परवडणार नाही, असे स्वामी जितेंद्रानंद सरस्वती स्पष्ट केले.