अहमदाबाद : अक्षरधामचे निर्माते व जगभरात अनुयायी असलेल्या स्वामी नारायण पंथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोचासणवासी अक्षर पुरुषोत्तम संस्थेचे आध्यात्मिक गुरू प्रमुख स्वामी महाराज नारायण स्वरूपदास यांचे शनिवारी सारंगपूर येथे निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. भगवान स्वामीनारायण परंपरेतील ते पाचवे गुरू होते आणि गेली सात दशके त्यांनी भारतातील आणि जगभरातील १७ हजार शहरांचा प्रवास करून संस्थेचे कार्य वाढविले होते. गेली दोन वर्षे ते आजारी होते आणि सारंगपूर येथील स्वामीनारायण मंदिरातच त्यांचा मुक्काम होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रमुख स्वामी महाराजांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले.
अतिशय निरलस, तसेच प्रेमळ गुरू असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. प्रमुख स्वामी महाराजांचा जन्म ७ डिसेंबर १९२१ रोजी बडोद्याजवळील एका गावातील शेतकरी कुटुंबात झाला होता. मात्र, वयाच्या १८ व्या वर्षी ते ब्रह्मस्वरूप शास्त्रीजी महाराजांच्या संपर्कात आले आणि साधू नारायणस्वरूप म्हणून ओळखले जाऊ लागले. संस्कृतचा अभ्यास केल्यानंतर सारंगपूरच्या स्वामीनारायण मंदिराचे कोठारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. शास्त्रीजी महाराजांनी त्यांची निष्ठा आणि काम पाहून १९५0 साली बीएपीएसच्या अध्यक्षपदी त्यांची नेमणूक केली, तेव्हा ते अवघे २९ वर्षांचे होते. शास्त्रीजी महाराजांचे १९५१ साली निधन झाल्यानंतर, आधी योगी महाराज यांची आणि नंतर प्रमुख स्वामी महाराजांची त्यांच्या जागी नेमणूक करण्यात आली. तेव्हापासून जवळपास ७ दशके प्रमुख स्वामी महाराज देशात आणि विदेशात समाजसेवा आणि सत्संग कार्यात गुंतले होते. आदिवासींच्या विकासात त्यांचा सहभाग होता. नैसर्गिक आपत्तीतही ते व अनुयायी मदत करताना दिसत. त्यांनी दिल्ली व गांधीनगरप्रमाणे देशात आणि परदेशात ११00 स्वामीनारायण मंदिरांची उभारणी केली.माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम, दलाई लामा, नरेंद्र मोदी, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस कोफी अन्नान यांच्यापासून जगभरातील अनेक नेत्यांनी प्रमुख स्वामी महाराजांच्या कार्याची अनेकदा प्रशंसा केली होती. (वृत्तसंस्था)तीव्र शोकबोचासणवासी अक्षर पुरुषोत्तम संस्थेचे प्रमुख स्वामी महाराज नारायण स्वरुपदासजी यांच्या निधनाने मला तीव्र दु:ख झाले आहे. त्यांचे आशीर्वाद घेण्याचे सौभाग्य मला मिळाले होते. साधुत्व, नम्रता, करुणा आणि सेवाभाव यामुळे ते संपूर्ण विश्वात ओळखले जात होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी आध्यात्माचे नेतृत्व केले. त्यांना विनम्र नमन. - विजय दर्डा, चेअरमन, लोकमत पत्र समूह