नवी दिल्ली : महिलांवरील लैंगिक शोषणाविरोधात सुरू ‘मी टू’चे स्वागत करताना, बालकांच्या लैंगिक शोषणा-विरोधात तक्रारी दाखल करण्यास १० ते १५ वर्षांचा कालावधी देणे गरजेचे आहे, असे मत महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी सोमवारी व्यक्त केले आहे.लैंगिक शोषणाविरोधात सुरू झालेल्या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला; मात्र या मोहिमेला स्वैर स्वरूप येता कामा नये आणि ही मोहीम नियंत्रणाबाहेर जाता कामा नये, असे आवाहन करून मनेका गांधी म्हणाल्या की, काही ना काही कारणास्तव ज्यांच्याकडून अपमान झाला आहे, त्यांना या मोहिमेद्वारे बदनाम वा लक्ष्य करू नये. जो पुरुष अशी कृत्ये करतो, तो कायमच महिलांच्या लक्षात राहतो. त्यामुळेच अगदी १० ते १५ वर्षांनीही महिलांना तक्रार करता यावी.कायदा मंत्रालय नक्की विचार करीलबालकांच्या शोषणाविरोधातही तक्रार करण्यासाठी अशीच मुभा असावी, बालकाने सज्ञान झाल्यावर वा वयाच्या १८ व्या वर्षी तक्रार केली तरी ती दाखल करण्यात यावी आणि त्याआधारे कारवाई करण्यात यावी, असे आपले म्हणणे आहे. सध्या शोषण झाल्यापासून सात वर्षांच्या आतच अशी तक्रार करता येते, हे खरे आहे. त्यामुळे कायदा मंत्रालयाने तक्रार करण्यासाठीची मुदत वाढवून देणे गरजेचे आहे. आपल्या या सूचनेवर कायदा मंत्रालयावर निश्चितच विचार करील, अशी आशा आहे, असेही मनेका गांधी म्हणाल्या.
बालकांच्या शोषणाच्या तक्रारी; सात वर्षांची मुदत वाढवून द्या -मनेका गांधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 2:47 AM