ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. २५ - पूरग्रस्त बिहारमध्ये मदतकार्यात गुंतलेल्या एनडीआरएफ जवानांच्या होडीमध्ये एका महिलेची प्रसूती झाली. सरोज पटेल असे या महिलेचे नाव असून तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. डॉक्टर किंवा अन्य कोणतीही वैद्यकीय सुविधा जवळ नसताना एनडीआरएफ जवानांनी या महिलेला प्रसूतीमध्ये मदत केली.
वैशाली जिल्ह्यातील एका गावात एनडीआरएफचे जवान मदतकार्यात गुंतले असताना त्यांना सरोज पटेल या महिलेच्या ओरडण्याचा आवाज कानावर पडला. सरोजला प्रसूती कळा येत होत्या. एनडीआरएफ जवानांनी लगेच जवळच्या रुग्णालयाला सरोजची माहिती कळवली.
रुग्णवाहिकेसह सर्व व्यवस्था रुग्णालयात सज्ज होती. एनडीआरएफचे जवान बोटीतून या महिलेला रुग्णालयाकडे घेऊन जात असातनाच या महिलेने होडीमध्येच सुंदर मुलाला जन्म दिला. बिहारची राजधानी पाटण्यापासून ६५ किमी अंतरावर ही घटना घडली.
एनडीआरएफ जवानांना अशा आपातकालीन परिस्थितीत प्रसूती कशी करावी याचेही प्रशिक्षण दिले जाते. मागच्यावर्षी आरामध्ये एका मुलाचा असाच नौकेमध्ये जन्म झाला होता. त्याला कुटुंबाने 'एनडीआर सिंह' असे नाव दिल्याची आठवण एका अधिका-याने सांगितली. मुसळधार पावसामुळे बिहार आणि उत्तरप्रदेशमध्ये गंभीर पूरपरिस्थिती आहे. याच आठवडयाच्या सुरुवातील उत्तरप्रदेशमध्ये एका महिलेने बचाव मोहिमेच्या होडीमध्ये अर्भकाला जन्म दिला होता.