इंदूर: मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये मनाला चटका लावणारी घटना घडली आहे. कारच्या चाकाखाली आल्यानं एका चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. काका कार मागे घेत असताना चिमुरला चाकाखाली आला आणि त्याचा मृत्यू झाला. काकांनी चिमुकल्याला कारमधून फिरवून आणल्यानंतर ही घटना घडली. कारखाली येताच चिमुकल्यानं आक्रोश केला. त्याची किंकाळी येऊन कुटुंबातील सदस्यांनी धाव घेतली. जखमी झालेल्या चिमुरड्याला डॉक्टरांकडे नेण्यात आलं. मात्र त्याचा मृत्यू झाला होता.
टिळक नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. तीन बहिणींपाठचा असलेला लविश कुटुंबियांचा लाडका होता. त्याच्या मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंबाला जबर मानसिक धक्का बसला आहे. महावीर तोतला नगरमध्ये घडलेल्या या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.
महावीर तोतला नगरमध्ये वास्तव्यास असलेले मुकेश कुमावत यांचा लहान भाऊ मनोज कुमावत जीप घेऊन त्यांचा दीड वर्षांचा पुतण्या लविशला फिरायला घेऊन गेले होते. घरी परतल्यावर त्यांनी लविशला गेटवर सोडलं. जीप मागे घेत असताना लविश चाकाखाली आला. त्याची किंकाळी ऐकून घरातील सगळ्यांनीच बाहेर धाव घेतली. मात्र तोपर्यंत लविशचा मृत्यू झाला होता.
घटनेनंतर कुमावत कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. लविशच्या काकांच्या मनावर मोठा आघात झाला आहे. जीप मागे घेत असताना हा प्रकार घडल्याचं तपास अधिकारी पी. एस. मिश्रा यांनी सांगितलं. सध्या पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे.