चंदीगड, दि. 2- चंदीगडच्या हर्षित शर्मा या 16 वर्षाच्या मुलाला गुगलने वार्षिक १ कोटी ४४ लाख रुपयांच्या पगाराच्या नोकरीची ऑफर दिल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरला झाली. मंगळवारी या तरूणाचीच सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळाली. पण टाइम्स ऑफ इंडियाने जेव्हा गुगलशी संपर्क साधला तेव्हा अशी कोणतीही ऑफर त्या मुलाला दिली नसल्याचा खुलासा गुगलने केला आहे. 'आमच्याकडे सध्या तरी हर्षित शर्माला नोकरीची ऑफर दिल्याची कोणतीही माहिती नाही.' असं गुगलच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. हर्षित ज्या शाळेत शिकतो त्या गव्हर्नमेंट मॉडेल सिनिअर सेकंडरीच्या एका अधिकाऱ्याने हर्षितला गुगलची जॉब ऑफर मिळाल्याची माहिती दिल्यावर ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली.'हर्षिद शर्मा हा मुलगा आमच्या शाळेतून यंदाच्याच वर्षी उत्तीर्ण होऊन बाहेर पडला आहे. त्यानेच स्वत: शाळेत येऊन ही माहिती दिली. त्याने व्हॉट्स अॅपवर ऑफर लेटरही पाठवलं होतं, पण ते नंतर माझ्याकडून डीलीट झालं. ते पत्र मिळताच मी तुम्हाला देईन, अस शाळेच्या मुख्याध्यापिका इंद्रा बेनीवाल यांनी सांगितलं आहे. पण आता हर्षित शर्मा या मुलाला कोणतीही ऑफर दिल्याची कोणतीही माहिती नसल्याचं गुगलने स्पष्ट केलं आहे. विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेला हर्षित एक सामान्य मुलगा आहे. यापूर्वी डिजीटल इंडिया मोहिमेत हर्षितला ७ हजार रुपयांचं बक्षीस मिळालं होतं, असं मुख्याध्यापकांनी सांगितलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने त्या मुलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्याच फोन बंद आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, गुगल शालेय विद्यार्थ्यांना कधीच नोकरी देत नाही.
नेमकं प्रकरण काय ?चंदीगड येथे राहणाऱ्या हर्षितने सरकारी मॉडल सीनियर सेकेंडरी स्कूलमधून यावर्षी बारावीची परीक्षा दिली. ऑगस्टमध्ये तो ट्रेनिंगसाठी अमेरिकेला जाणार आहे. इंटरनेट जायंट गूगलने हर्षित शर्मा आयकॉन डिजाइनिंगसाठी सिलेक्ट केलं आहे. आणि गूगलच्या या स्पेशल प्रोग्रामसाठी हर्षित एक वर्षाची ट्रेनिंग दिली जाईल. ट्रेनिंग दरम्यान त्याला प्रत्येक महिन्याला चार लाख रुपये पगार दिला जाणार आहे. ट्रेनिंग पूर्ण होताच हर्षितचा पगार 12 लाख रुपये प्रति महिना असेल, अशी माहिती समोर आली होती. गुगलने जॉबची ऑफर दिल्यानंतर मला पहिल्यांदा विश्वास बसला नाही. माझी 12 वी ची परिक्षा झाल्यानंतर मी ऑनलाइन जॉब सर्च करत होतो. मे मध्ये मी गुगलच्या पदासाठी अप्लाय केलं होतं. त्याचवेळी मी ऑनलाइन मुलाखतही दिली. गेल्या दहा वर्षापासून मला ग्राफिक्स डिजाइनिंगमध्ये आवड होती. मुलाखतीनंतर ज्यावेळी त्यांनी माझ्या कामाबातचा डाटा मागवला त्यावेळी मी जे पोस्टर डिझाईन केलं ते त्यांना पाठवलं होतं. त्यावरच मला ही संधी मिळाली आहे. गूगलने ऑगस्टमध्ये ज्वॉइन करण्यास सांगितलं आहे, अशी माहिती हर्षितने माध्यमांशी बोलताना दिली होती.